जाणून घ्या! जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 05:53 PM2020-03-23T17:53:27+5:302020-03-23T17:58:36+5:30

कोरोनाला अटकाव आणण्यासाठी देशात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नेमकं जमावबंदी आणि संचारबंदी यातील फरक आपण जाणून घेऊया!

What isThe difference between mobilization and curfew pda | जाणून घ्या! जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय?

जाणून घ्या! जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय?

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाची बाधा वाढत असल्याने महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे.रस्त्यावर केवळ प्रशासन आणि पोलीस कर्मचारीच दिसतात. रुग्णालय वगळता सर्व आवश्यक सुविधाही बंद केल्या जातात.

कोरोनाने जगभरात दहशत माजवली असून देशातही कोरोना तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे. या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, लोकांनी गर्दी करणं, बाहेर पडणे काही सोडलेले नाही आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना कायद्याचे पालन करण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले आहेत. काल मोदींच्या जनता कर्फ्यूच्या आवाहनाला भारतीयांना अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. मात्र, कोरोनाची बाधा वाढत असल्याने महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाला अटकाव आणण्यासाठी देशात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. नेमकं जमावबंदी आणि संचारबंदी यातील फरक आपण जाणून घेऊया!

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा केली आणि राज्यात संचारबंदी जाहीर केली असून राज्याची सीमा देखील बंद केली आहे. साथीचे रोग (महामारी) नियंत्रण अधिनियम १८९७ कायद्यांतर्गत देशात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. सीआरपीसी १९७३ कलम १४४ चा वापर करण्यात येत आहे.

जमावबंदी म्हणजे काय?

कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचू नये, दंगल, हिंसाचार संभव तसेच मानवी जीवाला आणि आरोग्याला धोका असल्यास यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश जारी केले जातात. नोटीस काढून कुठल्याही व्यक्तीला काही कृत्य करण्यापासून रोखण्यात येते. या प्रकारच्या नोटिसा या विशिष्ट भागात राहणाऱ्या व्यक्ती किंवा त्या भागात जाणाऱ्या लोकांना बजाविण्याची तरतूद आहे. कलम १४४ हे फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) १९७३ मधील असून, ते सुरक्षितता म्हणून लागू केले जाते. जमावबंदीचा आदेश हा जिल्हाधिकारी देतात. जमावबंदी लागू झाली असल्यास एखाद्या परिसरातील शांतता भंग होऊ नये, यासाठी चारपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जातो. जमावबंदीचा आदेश हा दोन महिन्यांपर्यंत असतो. दोन महिन्यांचा कालावधी संपल्यास पुन्हा हा कालावधी वाढविला जातो.

अटक होऊ शकते
कलम १४४ चं उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकते. कलम १०७ किंवा कलम १५१ अंतर्गत ही अटक करता येते. कलम १४४ अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.

साथीचे रोग (महामारी) नियंत्रण अधिनियम १८९७

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी देशात साथीचे रोग नियंत्रण अधिनियम १८९७ (Epidemic diseases act, 1897) लागू करण्यात आला आहे. एखाद्या रोगाला आळा घालण्याचे प्रयत्न हतबल होत असल्यास  हा कायदा लागू करण्याची तरतूद आहे.

Coronavirus Breaking: महाराष्ट्रात संचारबंदी लागू, जिल्ह्यांच्या सीमाही सील; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा


संचारबंदी (कर्फ्यू)  म्हणजे काय?

संचारबंदी लागू झाल्यानंतर नागरिकांना घराबाहेर पडण्यावर कडक निर्बंध लावले जातात. त्यास 'कर्फ्यू' असेही म्हटले जाते. कलम १४४ मधील तरतुदीनुसार जमावबंदी आणि संचारबंदी लागू होते. संचारबंदी लागू झाल्यास निवडण्यात आलेली ठिकाणे किंवा परिसरात नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. दंगलग्रस्त भागात संचारबंदी लागू करण्यात येत असते. आपत्कालीन परिस्थितीतही त्याचा वापर करण्यात येतो. संचारबंदी लागू होताच सर्व अधिकारी जिल्हाधिकारी किंवा पोलीस आयुक्तांकडे येतात.  कलम १४४ मध्ये कर्फ्यू लावण्याची तरतूद आहे. याचं उल्लंघन केल्यास कारवाई होते. नियम मोडल्यास कोणालाही अटक करण्याचे अधिकार पोलिसांना असतात. संचारबंदी लागताच जिल्हा प्रशासनाला कारवाई करण्याची पूर्ण मुभा मिळते. याकाळात कोणीही घराहेर पडू शकत नाही. बँका बंद राहतात. किराणाची दुकानंही बंद केली जातात. दूध आणि भाजीपाला विकण्यावर बंद असते. हॉटेलही बंद ठेवावे लागतात. (संचारबंदी) कर्फ्यूचा अर्थ सर्वकाही बंद आहे. रस्त्यावर केवळ प्रशासन आणि पोलीस कर्मचारीच दिसतात. रुग्णालय वगळता सर्व आवश्यक सुविधाही बंद केल्या जातात.

Web Title: What isThe difference between mobilization and curfew pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.