अहमदाबादमधील निकोल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मोठ्या ज्वेलरी शोरूममध्ये काम करणारी सेल्स गर्ल चक्क दीड कोटीहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना शोरूममध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणीचा शोध सुरू केला आहे.
निकोल परिसरात दर्शनभाई नावाच्या व्यावसायिकाचं सोन्या-चांदीचे शोरूम आहे. या शोरूममध्ये मॅनेजर, सेल्समन आणि मार्केटिंग स्टाफसह एकूण १९ कर्मचारी काम करतात. हर्षिदा शेट्टी नावाची तरुणी गेल्या ११ महिन्यांपासून येथे सेल्स गर्ल म्हणून नोकरीला होती. मात्र, हीच तरुणी शोरूमला कोट्यवधींचा चुना लावेल, याची कोणालाही पुसटशी कल्पना नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे २०२६ रोजी दुपारी शोरूमचे मालक दर्शनभाई जेवणासाठी घरी गेले होते. त्यावेळी शोरूममध्ये मॅनेजर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. हीच संधी साधून हर्षिदाने शोरूममधील सोन्याचे दागिने हळूच आपल्या युनिफॉर्मच्या खिशात लपवण्यास सुरुवात केली. त्यानंतर, 'मालकांनी मला सुट्टी दिली आहे, कामासाठी बाहेर जात आहे' असे इतर कर्मचाऱ्यांना सांगून ती शोरूमबाहेर पडली.
असा झाला चोरीचा खुलासा
संध्याकाळी ५ च्या सुमारास जेव्हा दर्शनभाई शोरूममध्ये परतले, तेव्हा एक ग्राहक खरेदीसाठी आला होता. दागिने दाखवत असताना कर्मचारी कानजीभाई यांच्या लक्षात आलं की, ट्रेमधील सोन्याचं एक ब्रेसलेट गहाळ आहे. ग्राहक गेल्यानंतर त्यांनी ही बाब मालकांच्या कानावर घातली. शोधाशोध केली असता हर्षिदा शेट्टी देखील शोरूममध्ये नसल्याचं समोर आलं.
CCTV फुटेजने केली पोलखोल
इतर कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, हर्षिदा साडेचार वाजताच सुटी घेऊन गेली आहे. मात्र दर्शनभाईंनी कोणतीही सुटी मंजूर केली नसल्याचं स्पष्ट केल्याने संशय बळावला. त्यानंतर शोरूमचे CCTV फुटेज तपासले असता चोरीचा सर्व प्रकार उघड झाला. CCTV फुटेजमध्ये हर्षिदा दुपारी ४ ते ४:३० च्या दरम्यान आपल्या सीटच्या मागे असलेल्या कपाटातून सोन्याचे दागिने काढून खिशात भरताना स्पष्ट दिसत आहे.
१.६६ कोटींचे दागिने लंपास
हर्षिदा दुसऱ्या मजल्यावरील स्टोअर रूममध्ये गेली, आपली बॅग घेतली आणि शोरूममधून निघून गेली. चोरीनंतर तिने आपला मोबाईलही बंद केला आहे.
शोरूममधील स्टॉकची तपासणी केली असता, हर्षिदाने १.६६ कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याचं निष्पन्न झालं. यात सोन्याच्या चैन, घड्याळं, झुमके, मंगळसूत्र, पेंडंट आणि अंगठ्यांचा समावेश आहे. निकोल पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपी तरुणीला पकडण्यासाठी पथकं रवाना केली आहेत.
Web Summary : In Ahmedabad, a sales girl absconded with ₹1.66 crore worth of gold jewelry from a showroom. CCTV footage revealed her stealing the items, leading police to launch a search.
Web Summary : अहमदाबाद में एक सेल्स गर्ल ने एक शोरूम से ₹1.66 करोड़ के सोने के गहनों का गबन कर लिया। सीसीटीवी फुटेज में उसे चोरी करते हुए दिखाया गया है, जिसके बाद पुलिस ने तलाशी शुरू कर दी है।