Gujarat Crime: गुजरातच्या जुनागढ शहरात एक थरारक घटना समोर आली आहे. एका ६३ वर्षीय वृद्ध महिलेच्या हत्येचा छडा पोलिसांनी लावला असून, यामध्ये किचनमधील चहाच्या एका रिकाम्या बशीने महत्त्वाच्या पुराव्याची भूमिका बजावली आहे. पैशांच्या वादातून मित्राच्याच वृद्ध आईचा गळा चिरणाऱ्या सुरेश ऊर्फ काना वाधवानी या नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
घरात रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
सुनीताबेन (वय ६३) असे या दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे. त्या जुनागढमध्ये पती आणि मुलगा दिलीप यांच्यासोबत राहत होत्या. काही दिवसांपूर्वी सुनीताबेन यांचा घरातच गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज किंवा कोणतेही तांत्रिक पुरावे नसल्याने हा तपास पोलिसांसाठी अत्यंत आव्हानात्मक बनला होता. पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला, मात्र ठोस काहीच हाती लागत नव्हते.
पोलिसांची तीक्ष्ण नजर आणि स्वयंपाकघरातील तो सस्पेन्स
तपास सुरू असताना पोलिसांनी गुन्ह्याच्या जागेची पुन्हा एकदा बारकाईने पाहणी केली. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांच्या नजरेत किचनच्या ओट्यावर पडलेल्या तीन न धुतलेल्या चहाच्या बश्या आल्या. इथूनच या प्रकरणाला नाट्यमय वळण लागले.
पोलिसांनी कुटुंबाकडे चौकशी केली असता समोर आले की, मृत सुनीताबेन आणि त्यांचा मुलगा दिलीप यांनी घटनेच्या दिवशी दुपारी एकत्र चहा घेतला होता. तसेच, घरातील धुणी-भांडी आणि स्वयंपाक करणारी महिला तिचे काम संपवून आधीच निघून गेली होती. यावरून पोलिसांनी तर्क लावला की, घरकाम करणारी महिला निघून गेल्यानंतर आणि सुनीताबेन यांची हत्या होण्यापूर्वी घरात नक्कीच तिसरी व्यक्ती आली होती, जिच्यासाठी चहा बनवला गेला होता. तिसरी बशी वापरणारी व्यक्ती ही घरातील सदस्यांच्या ओळखीचीच असणार, हा पोलिसांचा संशय पक्का झाला.
पोलिसांनी कुटुंबाच्या जवळच्या लोकांची यादी बनवून चौकशी सुरू केली. यामध्ये मुलगा दिलीपचा जवळचा मित्र सुरेश वाधवानी याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन जेव्हा पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला.
सुरेशने पोलिसांना सांगितले की, त्याचे कपड्यांचे दुकान होते, जे त्याने बंद केले आणि झटपट पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी तो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करू लागला. मात्र, तिथे त्याला प्रचंड तोटा झाला आणि तो कर्जाच्या विळख्यात अडकला. हे कर्ज फेडण्यासाठी तो दिलीपची आई सुनीताबेन यांच्याकडे आर्थिक मदत मागण्यासाठी गेला होता.
सुरेश जेव्हा घरात आला, तेव्हा सुनीताबेन यांनी त्याला चहा दिला. सुरेशने पैशांची मागणी केली असता, सुनीताबेन यांनी स्पष्ट सांगितले की, पैसे मिळतील पण त्यासाठी तुला काहीतरी तारण ठेवावे लागेल." तारण ठेवण्याच्या या मागणीवरून सुरेश आणि सुनीताबेन यांच्यात जोरदार वाद सुरू झाला. वाद इतका वाढला की, रागाच्या भरात सुरेशने स्वतःजवळ असलेला धारदार चाकू काढला आणि सुनीताबेन यांचा गळा चिरून तिथून पळ काढला.
संशय येऊ नये म्हणून अंत्यसंस्कारातही हजेरी
आपल्यावर कोणाचा संशय येऊ नये म्हणून सुरेश अत्यंत हुशारीने वागत होता. हत्या केल्यानंतरही तो मित्र दिलीप आणि त्याच्या कुटुंबाच्या जवळच राहिला. इतकेच नव्हे तर सुनीताबेन यांच्या अंत्ययात्रेत आणि अंत्यसंस्कारातही तो अगदी दुःखी असल्याचे दाखवत होता. मात्र, किचनमध्ये सोडलेली चहाची ती एक बशी या हत्येचा छडा लावण्यासाठी पुरेशी ठरली. पोलिसांनी सुरेशला अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.
Web Summary : In Gujarat, a teacup led police to a killer. Suresh murdered his friend's mother over money, even attending her funeral. Police investigation revealed the truth.
Web Summary : गुजरात में, एक चाय के प्याले ने पुलिस को हत्यारे तक पहुँचाया। सुरेश ने पैसे के लिए अपने दोस्त की माँ की हत्या कर दी, और उसके अंतिम संस्कार में भी शामिल हुआ। पुलिस जांच में सच्चाई सामने आई।