पुणे - पुणेकरांसाठी दिलासादायक ठरणारी महत्त्वाची आरोग्य सुविधा आता बाणेरमध्ये उपलब्ध झाली आहे. पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कर्करोग रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या रुग्णालयात पुणेकरांना केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेच्या (CGHS) दरात कॅन्सरवरील उपचार मिळणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यात कर्करोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगितले. मात्र, वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपचारांतील विलंबामुळे रुग्णांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारकडून विविध आरोग्य योजनांमध्ये कर्करोग उपचारांचा समावेश करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बाणेर परिसरातील महापालिकेच्या सुमारे एक एकर जागेवर हे आधुनिक कर्करोग केंद्र उभारण्यात आले आहे. सुमारे १६५ कोटी रुपयांच्या या प्रकल्पात १५० खाटांची सुविधा उपलब्ध असून, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येथे कार्यरत असणार आहे.
या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेने १४ कोटी रुपयांची जागा उपलब्ध करून दिली असून, उर्वरित गुंतवणूक, व्यवस्थापन आणि कर्मचारी खर्चाची जबाबदारी आपुलकी मेडिकल केअर सेंटरकडे असणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभर ‘कर्करोग ग्रीड’ उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती दिली. या ग्रीडच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील रुग्णांना अधिक सक्षम, समन्वयित आणि जलद आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार , मंत्री चंद्रकांत पाटील , खासदार मेधा कुलकर्णी, तसेच विविध लोकप्रतिनिधी, वैद्यकीय अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Web Summary : Pune gets a new 165-crore cancer hospital in Baner, offering CGHS rates. The facility, a joint effort, has 150 beds and modern equipment. Government aims for better cancer care access across Maharashtra with 'Cancer Grid'.
Web Summary : पुणे को बानेर में 165 करोड़ का कैंसर अस्पताल मिला, जो सीजीएचएस दरों की पेशकश करता है। संयुक्त प्रयास से बनी सुविधा में 150 बेड और आधुनिक उपकरण हैं। सरकार का लक्ष्य 'कैंसर ग्रिड' के साथ महाराष्ट्र में बेहतर कैंसर देखभाल पहुंच है।