NEET Paper Leak: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने अत्यंत वेगाने तपास सुरु केला आहे. या तपासाचे धागेदोरे नाशिकनंतर आता थेट पुण्यापर्यंत पोहोचली आहेत. सीबीआयनेपुणे येथील एका नामांकित कॉलेजशी संबंधित प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शनिवारी सीबीआयच्या पथकाने मनीषा मांढरे यांच्या पुणे येथील निवासस्थानी धाड टाकत त्यांची कसून चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.
विषयांची विभागणी करून पेपर केला लीक!
सीबीआयच्या तपासात या रॅकेटचे अत्यंत धक्कादायक आणि नियोजनबद्ध स्वरूप समोर आले. आरोपींनी नीट परीक्षेचा पेपर लीक करण्यासाठी चक्क विषयांची आपापसात वाटणी केली होती, अशी माहिती समोर आली आहे. यामध्ये केमिस्ट्री विषयाचे प्रश्न लीक करण्याची जबाबदारी प्रल्हाद कुलकर्णी याच्यावर होती, तर बायोलॉजी विषयाचे प्रश्न सांभाळण्याची आणि ते लीक करण्याची जबाबदारी प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्याकडे होती.
लातूर कनेक्शन ते पुण्याची गंगा ओशियाना सोसायटी
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि एजंट एकमेकांशी कसे जोडले गेले होते, याचा सीबीआयने पर्दाफाश केला. तपासादरम्यान, या प्रकरणातील संशयित एजंट मनीषा वाघमारे आणि प्रल्हाद कुलकर्णी हे एकमेकांना लातूरमध्ये असल्यापासून ओळखत होते. तर दुसरीकडे, प्रल्हाद कुलकर्णी आणि प्राध्यापिका मनीषा मांढरे हे दोघेही नीट परीक्षेसाठी पेपर सेट करण्याच्या कामाशी आधीपासून जोडलेले होते, अशी माहिती समोर आली.
प्राध्यापिका मनीषा मांढरे या काही काळापूर्वी पुण्याच्या बिबवेवाडी भागातील गंगा ओशियाना सोसायटीमध्ये राहण्यास आल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणातील मनीषा वाघमारे ही महिला एजंट आधीपासूनच याच सोसायटीमध्ये राहत होती.
घरून चालायच्या कोचिंग क्लासेस
प्राध्यापिका मनीषा मांढरे आणि प्रल्हाद कुलकर्णी हे दोघेही आपापल्या घरातून कोचिंग क्लासेस चालवत होते. एजंट मनीषा वाघमारे ही या दोघांच्याही घरी सातत्याने संपर्कात असायची आणि त्यांच्या घरी जात-येत असायची. लीक झालेला पेपर अत्यंत नियोजनबद्ध रितीने एजंट्सच्या एका साखळीद्वारे देशभरात पोहोचवण्यात आला.
आधी प्राध्यापिका मांढरे आणि कुलकर्णी यांच्याकडून लीक झालेला पेपर मनीषा वाघमारेकडे आला. वाघमारेने हा पेपर धनंजय लोखंडे नावाच्या एजंटकडे सोपवला. त्यानंतर लोखंडेने हा पेपर नाशिकच्या शुभम खैरनारपर्यंत पोहोचवला. नाशिकच्या शुभम खैरनारने हे प्रश्न थेट गुरुग्रामच्या (हरियाणा) यश यादव याच्याकडे पाठवले. गुरुग्रामच्या यश यादवने हा पेपर पुढे राजस्थानमधील सीकर येथील बिवाल ब्रदर्स यांच्यासोबत शेअर केला.
सीबीआयचा कसून तपास सुरू
पुणे, नाशिक, लातूर, गुरुग्राम ते थेट राजस्थानपर्यंत पसरलेल्या या पेपर लीक रॅकेटचे संपूर्ण जाळे शोधण्यासाठी सीबीआयने कसून तपास सुरु केला आहे. या देशव्यापी घोटाळ्यात आणखी कोणते मोठे मासे अडकले आहेत, तसेच या रॅकेटमध्ये आणखी किती एजंट्स आणि विद्यार्थ्यांचा समावेश आहे, याचा शोध घेण्यासाठी सीबीआय मनीषा मांढरे आणि इतर संशयितांची कसून चौकशी करत आहे.
Web Summary : CBI investigates NEET paper leak, tracing it from Latur to Pune. Professor Manisha Mandhare arrested for alleged involvement in leaking Biology questions. The probe reveals a network of agents across multiple states.
Web Summary : सीबीआई ने नीट पेपर लीक की जांच की, जो लातूर से पुणे तक फैली है। बायोलॉजी के प्रश्न लीक करने के आरोप में प्रोफेसर मनीषा मांढरे गिरफ्तार। जांच में कई राज्यों में एजेंटों का नेटवर्क सामने आया।