Sumit Satish Rastogi: महाराष्ट्रात महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरातचे प्रकरण ताजे असतानाच, ऑस्ट्रेलियातूनही अशीच एक भारतीय वंशाच्या नराधमाचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील अॅडलेड शहरात तब्बल ६१ महिलांवर अत्याचार करणाऱ्या सुमित सतीश रस्तोगी (वय ३९) या भारतीय वंशाच्या मसाज थेरपिस्टला तिथल्या न्यायालयाने १३ वर्षे आणि १० महिन्यांच्या तुरुंगवासाची कठोर शिक्षा सुनावली आहे. या विकृताने उपचाराच्या बहाण्याने आलेल्या महिलांचे गुप्त व्हिडिओ देखील बनवले होते.
दिल्ली ते ऑस्ट्रेलिया
मूळचा दिल्लीचा असलेला सुमित रस्तोगी २०११ मध्ये ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाला होता. अॅडलेडमधील एका मसाज पार्लरमध्ये तो काम करत होता. धक्कादायक म्हणजे, मसाज थेरपीचे कोणतेही अधिकृत शिक्षण किंवा पात्रता नसतानाही तो हे काम करत होता. ऑक्टोबर २०२१ ते जुलै २०२२ या अवघ्या ९ महिन्यांच्या काळात त्याने पार्लरमध्ये येणाऱ्या महिलांचा विनयभंग केला. सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या त्याच्या कृत्यांनी हळूहळू विकृत घेतले. त्याने महिलांच्या अंतर्वस्त्रांशी छेडछाड करणे आणि त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो चोरून काढण्यास सुरुवात केली. अखेर जुलै २०२२ मध्ये त्याला अटक करण्यात आली.
१३ वर्षांची शिक्षा; ९७ गुन्ह्यांची दिली कबुली
दक्षिण ऑस्ट्रेलिया जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश कारमेन माटेओ यांनी या प्रकरणाची सुनावणी करताना सुमितच्या कृत्यांवर संताप व्यक्त केला. तू महिलांच्या सुरक्षिततेचा आणि विश्वासाचा क्रूर गैरफायदा घेतलास, अशा शब्दांत न्यायाधीशांनी त्याला फटकारले. सुमितने न्यायालयात स्वतःच्या ९७ गुन्ह्यांची कबुली दिली, ज्यामध्ये ५५ वेळा चोरून व्हिडिओ काढणे आणि ४२ वेळा गंभीर लैंगिक अत्याचार करणे याचा समावेश होता. न्यायालयाने त्याला जवळपास १४ वर्षांची शिक्षा सुनावताना १० वर्षे आणि १० महिन्यांपर्यंत पॅरोल नाकारला आहे. शिक्षा पूर्ण झाल्यावर त्याला ऑस्ट्रेलियातून हाकलून दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
हनिमून ठरला भयानक आठवण
या नराधमाच्या कृत्यामुळे अनेक महिलांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. एका पीडित महिलेने न्यायालयात सांगितले की, "माझ्या हनिमूनच्या वीकेंडला मी तिथे गेले होते. आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण या घटनेमुळे एका भयानक आठवणीत बदलले. आता मला कोणत्याही पुरुष डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टवर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे."
आरोपीला मानसिक आजार
सुनावणीदरम्यान मानसोपचार तज्ज्ञांनी न्यायालयात सांगितले की, सुमितला व्हॉयरिस्टिक डिसऑर्डर नावाचा मानसिक आजार आहे. या आजारात व्यक्तीला नकळत अर्धवट कपड्यातील महिलांना पाहून लैंगिक आनंद मिळतो. मात्र, या आजारामुळे त्याचा गुन्हा कमी होत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. दुसरीकडे, पीडित महिलांनी सुमितने मागितलेली माफी फेटाळून लावत, ही माफी निव्वळ एक नाटक असल्याचे म्हटले.
Web Summary : Indian-origin therapist in Australia jailed for sexually assaulting 61 women under pretext of massage. He secretly filmed victims. One victim's honeymoon became a horrific memory. He was diagnosed with voyeuristic disorder.
Web Summary : ऑस्ट्रेलिया में भारतीय मूल का थेरेपिस्ट मसाज के बहाने 61 महिलाओं का यौन शोषण करने के आरोप में जेल गया। उसने गुप्त रूप से पीड़ितों का फिल्मांकन किया। एक पीड़िता का हनीमून एक भयानक याद बन गया। उसे कामुक विकार का पता चला।