Drone Attack on Nuclear Plant in Abu Dhabi: संयुक्त अरब अमिरातीची (UAE) राजधानी अबू धाबीमधून एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. बरका अणुऊर्जा प्रकल्पाजवळील एका विद्युत जनरेटरवर ड्रोन हल्ला झाल्याने आग लागली. ही घटना अल-धाफ्रा परिसरात घडली. सुदैवाने, यात कोणीही जखमी झाले नाही आणि अणुकिरणोत्सर्गाचा कोणताही धोका नव्हता. संयुक्त अरब अमिरातीने (UAE) या हल्ल्याला दहशतवादी हल्ला घोषित केले असून, हा हल्ला पश्चिम सीमेवरून झाला असल्याचे म्हटले आहे. प्रशासनाने सांगितले की, घटनेनंतर तातडीने आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि आग नियंत्रणात आणण्यात आली.
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, या घटनेमुळे प्रादेशिक सुरक्षेची चिंता आणखी वाढली आहे. बरका अणुऊर्जा प्रकल्प हा संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) एकमेव अणुऊर्जा प्रकल्प असून तो देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अबू धाबीच्या माध्यम कार्यालयाने 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही आणि किरणोत्सर्गाचा कोणताही धोका नव्हता. किरणोत्सर्ग सुरक्षा पातळी सामान्य राहिली. केवळ बाहेरील जनरेटरला आग लागली होती, जी नंतर नियंत्रणात आणण्यात आली.
हे प्रकरण संवेदनशील का आहे?
अणुऊर्जा प्रकल्पांवरील ड्रोन हल्ले ही जगभरातील चिंतेची बाब आहे. जर ड्रोन प्रकल्पाच्या आत पोहोचला असता किंवा त्याने अणुभट्टीला लक्ष्य केले असते, तर त्यामुळे मोठी दुर्घटना घडू शकली असती. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) म्हटले आहे की, यूएईच्या बरका अणुऊर्जा प्रकल्पातील (एनपीपी) परिस्थिती सध्या सामान्य आहे. आयएईएने म्हटले आहे की, ते यूएईच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून, गरज भासल्यास मदत करण्यास तयार आहेत. आयएईएने या हल्ल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
सुरक्षा यंत्रणा सतर्क; पुन्हा युद्धाचे ढग
या घटनेनंतर, सुरक्षा यंत्रणांनी परिसरातील पाळत वाढवली आहे. तथापि, यूएई प्रशासनाने अद्याप या हल्ल्यामागे असलेल्या कोणत्याही देशाचे किंवा संघटनेचे नाव अधिकृतपणे जाहीर केलेले नाही. अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधी कायम आहे, परंतु ती अत्यंत नाजूक स्थितीत आहे. अशा परिस्थितीत, अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्यामुळे या भागातील तणाव पुन्हा वाढू शकतो.
Web Summary : A drone attack sparked a fire at a generator near Abu Dhabi's Barakah nuclear plant. UAE officials are calling it a terrorist attack. No injuries or radiation leaks were reported, but the incident raises regional security concerns amid existing tensions.
Web Summary : अबू धाबी के बरका परमाणु संयंत्र के पास एक जनरेटर पर ड्रोन हमले से आग लग गई। यूएई के अधिकारियों ने इसे आतंकवादी हमला बताया है। कोई घायल नहीं हुआ और विकिरण का रिसाव नहीं हुआ, लेकिन इस घटना से क्षेत्रीय सुरक्षा चिंताएँ बढ़ गई हैं।