वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:02 IST2025-12-01T12:00:35+5:302025-12-01T12:02:22+5:30
खूप शोध घेतल्यानंतर, वधूच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून सत्य बाहेर आले.

वरमाला झाली, वधू स्टेजवरून उतरली... अन् थेट प्रियकरासोबत पळून गेली! सप्तपदीपूर्वीच लग्नात मोठा राडा
लग्नघरात बँड-बाजा वाजत होता, रोषणाईने आसमंत उजळून निघाला होता आणि आनंदाच्या वातावरणात वधू-वर पक्ष एकमेकांच्या कुटुंबासोबत धमाल करत होते. वरमालेचा कार्यक्रमही मोठ्या उत्साहात पार पडला. पण त्यानंतर जे घडले, त्याने साऱ्या लग्नाची मजा एका क्षणात मातीमोल केली. सप्तपदींसाठी वधू मंडपात यायला तयार झाली आणि अचानक ती घरातून गायब झाली. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात हा अनोखा प्रकार समोर आला आहे. या भागात राहणारी एक नवरी वरमाला होताच आपल्या प्रियकरासोबत पळून गेली, त्यामुळे बिचारा नवरदेव वरात घेऊन रिकाम्या हाताने परत गेला.
वरमाला घातली आणि वधू रूममध्ये गेली...
उन्नाव जिल्ह्यातील पुरवा कोतवाली अंतर्गत अजयपूर गावात २९ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला. वधूच्या घरी पुरवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातून मोठ्या थाटामाटात वरात आली होती. वधू पक्षाकडून वराचे आणि वऱ्हाडी मंडळींचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. द्वारपूजन झाल्यावर वरमालेचा कार्यक्रमही झाला, जिथे वधूने नवरदेवाच्या गळ्यात आनंदाने वरमाला घातली. हसतखेळत कार्यक्रम पार पडल्यावर वधू आपल्या खोलीत गेली. यानंतर तिला मंडपात सप्तपदीसाठी यायचे होते.
मंडपासाठी शोध घेतला, पण वधू बेपत्ता!
जेव्हा वधूला सप्तपदीसाठी बोलवण्याची वेळ आली, तेव्हा घरातील मंडळी तिला शोधायला तिच्या खोलीत गेली. पण, वधू तिथे नव्हती. घरातील लोकांनी तिला पूर्ण घरात आणि परिसरात शोधले, पण ती कुठेच सापडली नाही. वधू अचानक गायब झाल्याची बातमी कळताच दोन्हीकडील मंडळींना मोठा धक्का बसला. क्षणभर कुणालाच काही कळेना. काही वेळाने सत्य समोर आल्यावर लग्नाच्या आनंदी वातावरणात क्षणात मातम पसरला.
प्रेमासाठी मंडपातून काढला पळ!
खूप शोध घेतल्यानंतर, वधूच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून सत्य बाहेर आले. वधूचे त्यांच्या गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. वडिलांनी पोलिसांना सांगितले की, ठरल्यानुसार वरात आली, जयमालाही झाली. पण सप्तपदीपूर्वीच त्यांची मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली आहे.
घरातील सर्व आनंद एका रात्रीत दुःखात बदलला. नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी शेवटी वधुविना वरात घेऊन परत गेले. वधूच्या वडिलांनी तिच्या प्रियकरावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुरवाचे स्टेशन प्रभारी अमरनाथ यादव यांनी सांगितले की, "तरुणी सज्ञान आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे."