भयंकर! वय २२, तीन बायका, ७ मुलांचा बाप... चौथ्या लग्नाच्या नादात गर्भवती पत्नीची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 14:05 IST2026-01-03T14:04:14+5:302026-01-03T14:05:00+5:30
एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या तिसऱ्या पत्नीची हत्या केवळ यासाठी केली, कारण ती त्याच्या चौथ्या लग्नाच्या आड येत होती.

फोटो - tv9hindi
बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातून हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका २२ वर्षीय तरुणाने आपल्या तिसऱ्या पत्नीची हत्या केवळ यासाठी केली, कारण ती त्याच्या चौथ्या लग्नाच्या आड येत होती. या घटनेनंतर आरोपी तरुण फरार असून पोलीस त्याच्या शोधासाठी ठिकठिकाणी छापेमारी करत आहेत. या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण गावात दहशतीचं वातावरण आहे.
पूर्णिया जिल्ह्यातील अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जमरा गावातील ही घटना आहे. येथील रहिवासी असलेला सिंटू ऋषिदेव हा पंजाबमध्ये मजुरीचं काम करतो. पंजाबमध्येच त्याच्या गावाशेजारील ओराहा येथील कैलास ऋषिदेव हे देखील कुटुंबासह रोजगारासाठी गेलं होतं. तिथे सिंटूचं कैलास यांची मुलगी मंजू कुमारी हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. सिंटू कमवता मुलगा आहे हे पाहून कैलास यांनी मंजूचे लग्न त्याच्याशी लावून दिलं. अवघ्या ८ दिवसांपूर्वीच हे संपूर्ण कुटुंब पंजाबमधून पूर्णियाला परतलं होतं.
फोनमुळे झाली पोलखोल
आई रतनी देवी यांनी सांगितलं की, पंजाबमधून आल्यानंतर जावई त्यांच्यासोबतच राहत होता. ३ दिवसांपूर्वी सिंटूची आई धौली देवी त्यांच्या घरी आली आणि सुनेला आपल्यासोबत घेऊन गेली. मुलीच्या आईने सांगितलं की, लग्नानंतर काही दिवसांतच मंजूने सिंटूची चलाखी पकडली होती. फोनवर बोलत असताना तिला समजलं की सिंटू हा अत्यंत विलासी प्रवृत्तीचा माणूस आहे.
७ मुलांचा बाप आणि चौथीचा नाद
तपासात समोर आलं आहे की, सिंटूने यापूर्वीच दोन लग्न केली आहेत. पहिल्या पत्नीपासून त्याला ४ मुलं, तर दुसऱ्या पत्नीपासून ३ मुलं आहेत. विशेष म्हणजे, त्याची तिसरी पत्नी मंजू ही ४ महिन्यांची गर्भवती होती. मंजू सासरी गेल्यानंतर सिंटूच्या इतर दोन पत्नींनीही मोठा गोंधळ घातला होता. सिंटूचे आता चौथ्या मुलीशी प्रेमसंबंध सुरू झाले होते, लग्न करायचं होतं, ज्याला मंजूचा विरोध होता. सिंटूच्या फोनमध्ये अनेक मुलींचे नंबर होते आणि तो त्यांच्याशी सतत तासनतास बोलायचा.
झाडाझुडपात आढळला मृतदेह
मंजूच्या आईने सांगितलं की, मंगळवारी मुलीने फोन करून ती पतीसोबत बहदुरा बाजारला आल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तिचा संपर्क तुटला. कुटुंबीय जेव्हा मंजूच्या सासरी गेले, तेव्हा घराला कुलूप होतं आणि सर्वजण फरार होते. दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांना बांबूच्या बागेत एका महिलेचा मृतदेह झाडाझुडपांनी झाकलेल्या अवस्थेत आढळला. अकबरपूर पोलीस ठाण्याचे विनय कुमार यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानुसार, गळा दाबून ही हत्या करण्यात आल्याचे दिसत आहे. नातेवाईकांनी जावई सिंटू ऋषिदेव आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध हत्येची तक्रार दाखल केली आहे. पोलीस सध्या फरार आरोपीचा शोध घेत आहेत.