UP Crime: सोशल मीडियाच्या फसवणुकीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील, पण उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. एका पतीने इन्स्टाग्रामवर ज्या मुलीला आपली गर्लफ्रेंड मानले होते, ती त्याची स्वतःची पत्नी निघाली. पत्नीने रचलेल्या या जाळ्यात पती असा काही अडकला की, त्याची आता थेट तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
नवाबगंज येथील रहिवासी सोनी त्रिपाठी हिचे लग्न नऊ वर्षांपूर्वी प्रतापगडमधील प्रभुदत्त त्रिपाठी उर्फ राजा याच्याशी झाले होते. सोनीच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही वर्षांतच सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढले. गेल्या पाच वर्षांपासून ती आपल्या एक वर्षाच्या मुलीसह माहेरी राहत आहे. या काळात पतीने ना तिची विचारपूस केली, ना मुलीच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारली.
पती दाद देत नसल्याचे पाहून सोनीने त्याला धडा शिकवण्याचे ठरवले. तिने इन्स्टाग्रामवर एका अनोळखी मुलीच्या नावाने फेक प्रोफाईल तयार केले आणि आपल्याच पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. प्रभुदत्त या जाळ्यात अलगद अडकला. त्याने त्या अनोळखी मुलीशी चॅटिंग करायला सुरुवात केली. हळूहळू त्यांचे प्रेम बहरले आणि प्रभुदत्त चक्क त्या मुलीशी लग्न करण्यासही तयार झाला.
मंदिरात 'ती'ची वाट पाहत होता, पण...
अनेक दिवस बोलणं झाल्यानंतर प्रभुदत्तने भेटण्यासाठी तगादा लावला. सोनीने त्याला २ मे रोजी दारागंज येथील नागवासुकी मंदिरात भेटायला बोलावले. आपला नवा संसार सुरू होईल या आशेने प्रभुदत्त मोठ्या उत्साहात मंदिरात पोहोचला. मात्र, समोर ज्या मुलीची तो वाट पाहत होता, तिच्याऐवजी स्वतःची पत्नी सोनी उभी असलेली पाहून त्याला मोठा धक्का बसला.
हाणामारी आणि अटक
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच प्रभुदत्त संतापला. त्याने सोनीला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरडाओरडा झाल्यामुळे तिथे गर्दी जमली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांची कारवाई
सोनी त्रिपाठीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रभुदत्त विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस आता पुढील तपास करत आहेत.
Web Summary : Prayagraj man, fooled by wife's fake Instagram profile, planned to marry her. Meeting at temple revealed the truth. He assaulted her, arrested.
Web Summary : प्रयागराज में पति को पत्नी ने फर्जी इंस्टाग्राम प्रोफाइल से प्रेम जाल में फंसाया। मंदिर में मिलने पर सच्चाई सामने आई। मारपीट करने पर पति गिरफ्तार।