गेल्या अनेक महिन्यांपासून जगाची धाकधूक वाढवणारे अमेरिका आणि इराणमधील युद्ध आता संपण्याच्या मार्गावर आहे. या शतकातील सर्वात महत्त्वाचा राजनैतिक करार दोन्ही देशांमध्ये होण्याचे संकेत मिळत असून, केवळ एका पानाचा 'मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग' तयार करण्यात आला आहे. व्हाईट हाऊसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कराराचा मसुदा अंतिम टप्प्यात असून पुढचे ४८ तास जगाचे भवितव्य ठरवणारे असतील.
काय आहे या 'सिंगल पेज' फॉर्म्युल्यात?
या प्रस्तावित करारात एकूण १४ मुद्दे आहेत. यात प्रामुख्याने तात्काळ युद्धविराम लागू करणे आणि पुढील ३० दिवसांत पूर्ण करारापर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या बदल्यात इराण आपला अणू कार्यक्रम तात्पुरता थांबवण्यास तयार झाला आहे. तर दुसरीकडे, अमेरिका इराणवरील निर्बंध शिथिल करून त्यांची कोट्यवधी डॉलर्सची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जागतिक व्यापारासाठी कळीचा असलेला 'होर्मुझचा समुद्रमार्ग' मोकळा करण्यासाठी दोन्ही देश सहकार्य करणार आहेत.
वादाचा मुख्य मुद्दा अद्याप कायम?
कराराची तयारी झाली असली तरी एका मुद्द्यावर अजूनही पेच अडकला आहे. इराणने आपल्या युरेनियम संवर्धनावर किती काळ बंदी घालावी, यावरून ओढाताण सुरू आहे. अमेरिकेला ही बंदी २० वर्षांसाठी हवी आहे, तर इराण केवळ ५ वर्षांचा प्रस्ताव देत आहे. मात्र, मध्यस्थीनंतर हा आकडा १२ ते १५ वर्षांवर स्थिरावण्याची शक्यता आहे. इराणने अण्वस्त्रे तयार न करण्याची हमी दिल्यास त्यांना ठराविक मर्यादेपर्यंत युरेनियम संवर्धनाची मुभा मिळू शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी आणि भारतावर परिणाम
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या खाडीतील लष्करी हालचाली कमी करण्याचा घेतलेला निर्णय या कूटनीतीचाच भाग मानला जात आहे. स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे या ऐतिहासिक चर्चेचे नेतृत्व करत आहेत. जर हा करार यशस्वी झाला, तर अधिकृतपणे 'युद्ध समाप्ती'ची घोषणा होईल. या बातमीमुळे जागतिक बाजारपेठेसह भारतालाही मोठा दिलासा मिळणार आहे, कारण यामुळे इंधनाचे दर स्थिर होण्यास मदत होईल. पुढील चर्चा इस्लामाबाद किंवा जिनिव्हामध्ये होण्याची शक्यता असून, संपूर्ण जगाचे लक्ष आता तेहरानकडून येणाऱ्या प्रतिसादाकडे लागले आहे.
Web Summary : US and Iran are nearing a deal involving a ceasefire, Iran limiting its nuclear program, and the US easing sanctions. A key sticking point remains uranium enrichment duration. Successful agreement could stabilize global markets, benefiting India through stable fuel prices.
Web Summary : अमेरिका और ईरान युद्धविराम, ईरान द्वारा परमाणु कार्यक्रम सीमित करने, और अमेरिका द्वारा प्रतिबंधों में ढील देने के समझौते के करीब हैं। यूरेनियम संवर्धन की अवधि एक प्रमुख मुद्दा है। सफल समझौते से वैश्विक बाजार स्थिर हो सकते हैं, जिससे भारत को स्थिर ईंधन कीमतों के माध्यम से लाभ होगा।