सध्याच्या डिजिटल युगात एका क्लिकवर हवं ते सामान घरपोच मिळतं, पण याच सोयीसोबत ऑनलाईन फसवणुकीचे संकटही वाढलं आहे. कधी ऑर्डर दिलेला महागडा फोन गायब होतो, तर कधी बॉक्समध्ये चक्क विटा किंवा साबण निघतो. अशा वेळी सामान्य ग्राहक हतबल होतो आणि आपले पैसे बुडाले असं मानून गप्प बसतो. पण आता घाबरण्याची गरज नाही! बँकिंग सिस्टममधील 'चार्जबॅक' ही एक अशी शक्कल आहे, जिच्या मदतीने तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे व्याजासह परत मिळवू शकता.
नेमकं काय आहे हे 'चार्जबॅक' प्रकरण?
चार्जबॅक म्हणजे ग्राहकाला मिळालेले एक सुरक्षा कवच आहे. जर तुमच्या बँक खात्यातून पैसे कट झाले असतील पण त्याबदल्यात तुम्हाला योग्य सेवा किंवा वस्तू मिळाली नसेल, तर तुमची बँक मर्चंटच्या (विक्रेत्याच्या) बँकेकडून ते पैसे परत मागू शकते. ही सुविधा प्रामुख्याने क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असते.
तुमच्या परवानगीशिवाय खात्यातून पैसे कापले गेल्यास, पैसे कापले पण ऑर्डर डिलिव्हर झाली नसेल तर, मागवलेली वस्तू पूर्णपणे वेगळी, खराब किंवा बनावट निघाली तर, दुकानाने रिफंड देण्याचे मान्य करूनही पैसे परत दिले नसल्यास चार्जबॅकचा फायदा मिळतो.
पैसे परत मिळवण्यासाठी काय करावे?
१. बँकेला तात्काळ कळवा: फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सर्वात आधी तुमच्या बँकेच्या हेल्पलाईनवर फोन करा किंवा मोबाईल ॲपद्वारे व्यवहार 'डिस्प्युट' म्हणून मार्क करा. तक्रार केल्यावर 'सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर' घ्यायला विसरू नका.
२. पुराव्यांची जुळवाजुळव: तक्रार करताना तुमच्याकडे पेमेंटची पावती, ऑर्डर कन्फर्मेशनचा ईमेल आणि चुकीच्या वस्तूचे फोटो असणे आवश्यक आहे.
३. फॉर्म भरा: बँकेकडून चार्जबैक किंवा डिस्प्युट फॉर्म मागवून घ्या. त्यात व्यवहाराची तारीख, रक्कम आणि तक्रारीचे नेमके कारण स्पष्ट करा. बँक या पुराव्यांच्या आधारे तपास करते आणि काही आठवड्यांत तुमचे पैसे परत मिळवून देते.
वेळेचे भान ठेवा!
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, असा कोणताही फसवणुकीचा व्यवहार झाल्यापासून १२० दिवसांच्या आत तक्रार करणे अनिवार्य आहे. जितक्या लवकर तुम्ही पाऊल उचलाल, तितक्या लवकर पैसे मिळण्याची शक्यता जास्त असते.
सायबर क्राईम विसरू नका!
बँकेला सांगण्यासोबतच सरकाराच्या १९३० या राष्ट्रीय हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. यामुळे फ्रॉड करणाऱ्याचे खाते फ्रीज होण्यास मदत होते. लक्षात ठेवा, सतर्कता हाच सर्वात मोठा बचाव आहे. ऑनलाईन शॉपिंग करताना अज्ञात लिंकवर क्लिक करू नका आणि फसवणूक झाल्यास गप्प न बसता 'चार्जबॅक'चा आधार घ्या!
Web Summary : Faced online shopping fraud? Use 'Chargeback'! Report immediately to your bank with evidence like payment receipts and product photos within 120 days. Also, file a cybercrime complaint to freeze the fraudster's account and recover your money.
Web Summary : ऑनलाइन शॉपिंग में धोखाधड़ी होने पर 'चार्जबैक' का उपयोग करें! भुगतान रसीद और उत्पाद तस्वीरों जैसे सबूतों के साथ तुरंत अपने बैंक में 120 दिनों के भीतर रिपोर्ट करें। साथ ही, धोखेबाज का खाता फ्रीज करने और अपना पैसा वापस पाने के लिए साइबर अपराध शिकायत दर्ज करें।