Tiger Reserve: ‘टायगर स्टेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशच्या कान्हा व्याघ्र प्रकल्पातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देशातील वन्यजीवप्रेमींमध्ये चिंता वाढवली आहे. या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच केनाइन डिस्टेंपर व्हायरस (CDV) मुळे एका वाघीणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू झाला आहे. राज्यासाठी ही घटना मोठा इशारा मानली जात आहे. विशेष म्हणजे हा घातक व्हायरस कुत्र्यांमधून वन्यप्राण्यांमध्ये पसरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
वाघीण टी-१४१ आणि चार बछड्यांचा दुर्दैवी अंत
मृत झालेली वाघीण ‘टी-१४१’ काही दिवसांपूर्वीपर्यंत आपल्या चार बछड्यांसह जंगलात सुरक्षित फिरताना दिसत होती. मात्र अचानक त्यांची प्रकृती खालावू लागली. गस्ती पथकाने त्यांना अशक्त आणि आजारी अवस्थेत पाहिल्यानंतर तातडीने रेस्क्यू करून उपचार सुरू करण्यात आले. वन्यजीव तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय पथकाने प्रयत्न केले, पण व्हायरसमुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे खिळखिळी झाली होती. अखेरी वाघीण आणि चारही बछड्यांचा मृत्यू झाला.
तपासात CDV व्हायरसची पुष्टी
नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विद्यापीठ येथे करण्यात आलेल्या तपासणीत मृत्यूचे कारण केनाइन डिस्टेंपर व्हायरस (CDV) असल्याचे स्पष्ट झाले. हा तोच घातक व्हायरस आहे ज्यामुळे २०१८ मध्ये गुजरातच्या गीर राष्ट्रीय उद्यानात ३४ सिंहांचा मृत्यू झाला होता.
कुत्र्यांमधून जंगलात पोहोचला संसर्ग
वन विभागाच्या तपासात हा व्हायरस प्रामुख्याने पाळीव आणि भटक्या कुत्र्यांमध्ये आढळत असल्याचे समोर आले आहे. त्यातूनच हा संसर्ग जंगलात पोहोचल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला देण्यात आली आहे. सध्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी कान्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू केल्या आहेत.
प्रभावित परिसरातील सुमारे २ चौरस किलोमीटर क्षेत्र सील आणि ‘नो-गो झोन’ घोषित करण्यात आले आहे. याशिवाय, जलस्रोतांवर कडक नजर, जंगलात विशेष निगराणी पथकांची तैनाती आणि कान्हा परिसरालगतच्या ८ गावांमध्ये कुत्र्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. तसेच जंगल परिसरात ४० ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे सतत निरीक्षण सुरू आहे. तसेच, कान्हातील घटनेनंतर राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्पांमध्येही सतर्कता वाढवण्यात आली आहे.
Web Summary : A tigress and her four cubs died in Kanha Tiger Reserve due to Canine Distemper Virus (CDV), likely transmitted from dogs. The area is sealed, vaccinations are underway, and monitoring is intensified to prevent further spread. Other reserves are on alert.
Web Summary : कान्हा बाघ अभयारण्य में एक बाघिन और उसके चार शावकों की कैनाइन डिस्टेंपर वायरस (सीडीवी) से मौत हो गई, जो संभवतः कुत्तों से फैला। क्षेत्र सील, टीकाकरण जारी, निगरानी तेज। अन्य अभयारण्य अलर्ट पर।