Join us
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 19:55 IST

1 / 9
Central Railway First Non Ac Mumbai Local Train: मध्य रेल्वेने स्वयंचलित दरवाजा बंद होण्याच्या सुविधेने सुसज्ज असलेली अत्याधुनिक १२ डब्यांची विना-वातानुकूलित इएमयू रेक सादर केला. उपनगरीय रेल्वे सुरक्षा आणि प्रवासी सोयीमध्ये एक महत्त्वपूर्ण प्रगती साधली आहे. या लोकल ट्रेनची चाचणी होत आहे. परंतु, मुंबईकरांसाठी असलेल्या या नॉन एसी स्वयंचलित लोकलची चाचणी मुंबईत होणार नसून, थेट उत्तर प्रदेशात होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
2 / 9
देशातील पहिली स्वयंचलित दरवाजांच्या साध्या लोकलची चाचणी उत्तर भारतात सुरू करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश सीमेवरील रेकची खजुराहो-महोबा या ६३.२७ किलोमीटरच्या मार्गावर, झाशी विभागांतर्गत या अत्याधुनिक सखोल चाचणी सुरू आहे.
3 / 9
छतरपूर जिल्ह्यालगतचा हा मार्ग तुलनेने कमी वाहतुकीचा असल्याने तांत्रिक निरीक्षणांसाठी अनुकूल ठरत आहे. चेन्नईतील आयसीएफ येथे या स्वयंचलित दरवाजांच्या साध्या लोकलचे रेक तयार केले आहेत. यापैकी पहिला रेक काही दिवसांपूर्वी मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाला असून तो प्राथमिक तपासणीनंतर पुढील प्रक्रियेत आहे.
4 / 9
दरम्यान, दुसरा रेक तयार झाल्यानंतर त्याला मुंबईत न आणता थेट झाशी विभागात चाचणीसाठी पाठवण्यात आले आहे. या दुसऱ्या रेकवर सध्या सविस्तर ट्रायल सुरू आहे. मुंबई उपनगरी मार्गावरील प्रचंड गर्दी, त्याचवेळी धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमुळे दिवसा चाचणी घेणे अशक्य होते.
5 / 9
रात्रीच्या मर्यादित वेळेत सर्व प्रणालींची सर्वंकष चाचणी पूर्ण करणेही कठीण ठरत असल्याने रेल्वे प्रशासनाने दुसरा रेक चाचणीसाठी उत्तर भारतात हलवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सलग, निर्बाध आणि सखोल चाचण्यांसाठी आवश्यक वेळ आणि ट्रॅक उपलब्ध झाला आहे.
6 / 9
या ट्रायलदरम्यान स्वयंचलित स्लायडिंग दरवाजांची अचूकता, इंटरलॉकिंग सुरक्षा प्रणालीची विश्वसनीयता, दरवाजे उघडणे-बंद होण्याचा वेळ आणि स्थानकांवरील थांब्यांचा कालावधी यांचे बारकाईने परीक्षण केले जात आहे. दरवाजे पूर्णपणे बंद झाल्याशिवाय गाडी सुरू होणार नाही, ही प्रणाली प्रत्यक्ष परिस्थितीत किती प्रभावी ठरते, हेही तपासले जात आहे.
7 / 9
बंद दरवाजांच्या लोकलमध्ये व्हेंटिलेशन हे सर्वात मोठे आव्हान मानले जात असल्याने छतावरील ब्लोअर्सद्वारे ‘फोर्स्ड व्हेंटिलेशन’, लूव्हर डिझाइन दरवाजे आणि मोठ्या खिडक्यांमधून हवा खेळती राहते का, याची सखोल चाचणी सुरू आहे. गर्दीत प्रवाशांच्या चढ-उताराच्या सवयींमध्ये होणारे बदल, प्लॅटफॉर्मवरील हालचालींचा वेग आणि एकूण ऑपरेशनवर पडणारा ताण याचाही अभ्यास केला जाणार आहे.
8 / 9
मुसळधार पावसात पाणी डब्यांमध्ये शिरू नये यासाठी ‘अँटी-वॉटर इन्ग्रेस’ प्रणालीची चाचणी घेतली जाणार आहे. सर्व टप्प्यांतील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हा रेक पुन्हा मुंबईत आणून अंतिम चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रवासी सेवेसंदर्भात निर्णय घेतला जाईल.
9 / 9
सुरक्षितता, शिस्त आणि वेळेचे गणित या तिन्ही बाबींमध्ये हा प्रयोग किती यशस्वी ठरतो, यावर पुढील दिशा ठरणार आहे. दुसऱ्या रेकच्या या चाचण्यांमधून रेल्वेला प्रत्यक्ष कार्यक्षमतेचा स्पष्ट अंदाज येणार असून, त्यानुसार पुढील निर्णय आणि अंमलबजावणीचा मार्ग निश्चित केला जाणार आहे.
टॅग्स :central railwayमध्य रेल्वेMumbai Localमुंबई लोकलlocalलोकलIndian Railwayभारतीय रेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेशMadhya Pradeshमध्य प्रदेशrailwayरेल्वेCSMTछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस