"मी सासूला संपवलंय..." हत्येचा थरार! सासूच्या हत्येनंतर सुनेचा पतीला फोन, बिहार हादरलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 21:14 IST2026-05-03T21:13:17+5:302026-05-03T21:14:50+5:30
बिहारच्या मधुबनीमध्ये एका सुनेने आपल्या सासूची हत्या करून पतीला फोनवरून माहिती दिली.

"मी सासूला संपवलंय..." हत्येचा थरार! सासूच्या हत्येनंतर सुनेचा पतीला फोन, बिहार हादरलं!
'मी सासूचा काटा काढलाय, आता मी चालले...' एखाद्या गुन्हेगारी चित्रपटातील असावा असा धक्कादायक संवाद बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात प्रत्यक्षात घडला आहे. एका सुनेने आपल्या ५० वर्षीय सासूची निर्घृण हत्या केली आणि त्यानंतर स्वतःच पतीला फोन करून गुन्ह्याची कबुली देत पळ काढला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी आरोपी सुनेचा शोध सुरू केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
बिहारमधील मधुबनी जिल्ह्याच्या कलुआही पोलीस ठाणे हद्दीतील मलमल (वॉर्ड क्रमांक ५) येथे ही घटना घडली. आशा देवी (वय ५० वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. या हत्येचा आरोप त्यांची सून पूनम देवी हिच्यावर आहे. प्राथमिक माहितीनुसार, पूनमने आपल्या सासूच्या डोक्यावर लोहेच्या जड वस्तूने प्रहार करून त्यांना जागीच संपवले.
असा झाला खुलासा!
या भयानक प्रकरणाचा उलगडा एका फोन कॉलमुळे झाला. आशा देवी यांचा मुलगा सरोज कुमार साहू याला त्याच्या पत्नीने म्हणजेच पूनमने फोन केला. "मी तुझ्या आईला मारून टाकले आहे आणि आता मी घर सोडून जात आहे," असे तिने थंडपणे सांगितले. हादरलेल्या सरोजने तातडीने आपल्या मेहुण्याला (सुनील कुमार साहू) फोन करून माहिती दिली.
सुनील तातडीने घटनास्थळी पोहोचला तेव्हा घराला बाहेरून कुलूप होते. संशय आल्याने त्याने खिडकीतून आत डोकावले असता, तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आणि कंबलेत गुंडाळलेला आशा देवी यांचा मृतदेह दिसला. हे दृश्य पाहून उपस्थितांच्या पायाखालची जमीनच सरकली.
गावकऱ्यांचा संताप अन् पोलिसांची धावपळ
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभय कुमार आणि ठाणे अध्यक्ष पायल भारती फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान, हत्येची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि गावातील हजारो नागरिक तिथे जमा झाले. संतापलेल्या गावकऱ्यांनी आरोपी सुनेला अटक करेपर्यंत मृतदेह नेण्यास मज्जाव केला. अखेर लोकप्रतिनिधी आणि पोलिसांनी समजूत काढल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी मधुबनी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.
आरोपी सून आहे 'डेंजर'!
स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनम देवीचे हे दुसरे लग्न होते. यापूर्वी तिचे लग्न शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीशी झाले होते, परंतु ते सोडून ती सरोजसोबत राहू लागली होती. पूनमचा स्वभाव अत्यंत तापट असून ती सतत सासूशी आणि शेजाऱ्यांशी भांडण करायची. यापूर्वी अनेकदा पंचायतीमध्ये त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न झाला होता, पण अखेर या वादाचा अंत रक्तानेच झाला. सध्या पोलीस फरार पूनम देवीचा शोध घेत असून, ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या टोकाच्या कृत्याने समाजमन सुन्न झाले आहे.