Video - तुफान राडा! "मी ठाकूर आहे, तुझी वाट लावेन"; बँक कर्मचाऱ्याची महिलेला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 12:06 IST2026-02-09T12:05:51+5:302026-02-09T12:06:44+5:30
बँकेतील एक महिला कर्मचारी आणि त्या बँकेत खातं असलेली महिला यांच्यात मोठा वाद होताना दिसत आहे.

Video - तुफान राडा! "मी ठाकूर आहे, तुझी वाट लावेन"; बँक कर्मचाऱ्याची महिलेला धमकी
कानपूरच्या पनकी भागातील एचडीएफसीबँकेच्या शाखेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बँकेतील एक महिला कर्मचारी आणि त्या बँकेत खातं असलेली महिला यांच्यात मोठा वाद होताना दिसत आहे. असा आरोप आहे की, महिलेने तक्रार केल्यावर बँक कर्मचाऱ्याने चुकीच्या भाषेचा वापर केला आणि "ठाकूर" असल्याचं सांगत धमकी दिली. या घटनेनंतर बँक कर्मचाऱ्यांचे वर्तन आणि ग्राहक सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतं की, महिला काउंटरसमोर उभी असून बँक कर्मचाऱ्याशी कोणत्यातरी समस्येबाबत बोलत आहे. संभाषणादरम्यान वातावरण अचानक तापतं. बँक कर्मचारी स्वतःला ठाकूर सांगून आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि महिलेला "मी ठाकूर आहे, तुझी वाट लावेन" असं धमकावते. इतकंच नाही तर ती टेबलावर ठेवलेले कागद उचलून त्या महिलेच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे.
अच्छी कर्मचारी है इसका गुमान नहीं। सही तरीके से काम किया यह तर्क नहीं । कानून का सम्मान यह दावा नहीं।
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) February 9, 2026
ठाकुर है इसीलिए इनसे डरना चाहिए।
फिर कहेंगे कि समाज में जाति नहीं है। जाति की बुनियाद पर समाज खड़ी है!
pic.twitter.com/nDM3StNY5u
घटनेच्या वेळी तिथे उपस्थित असलेले इतर बँक कर्मचारी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करतात. व्हिडिओमध्ये दुसरी एक महिला कर्मचारी मध्यस्थी करताना आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र संतापलेली बँक कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि ती सतत मोठ्या आवाजात बोलत राहिली. व्हिडिओमध्ये ती महिलेला असंही म्हणताना ऐकू येतं की, "हे जाऊन तुझ्या पतीला सांग."
व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक युजर्सनी बँक कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीवर प्रश्न उपस्थित करत याला ग्राहकाचा छळ म्हटलं आहे. लोकांचे म्हणणं आहे की, बँकांसारख्या संस्थांमध्ये ग्राहकांशी सभ्यतेने आणि संयमाने वागले पाहिजे, मग वाद कितीही मोठा का असेना. या संपूर्ण प्रकरणात अद्याप बँकेकडून कोणतंही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेलं नाही. तसेच हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे आणि बँक व्यवस्थापनाने या घटनेची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे की नाही, हे देखील अद्याप स्पष्ट झालेलं नाही.