जीवघेणा 'कोरियन लव्हर' गेम! प्राची बनली 'डेथ कमांडर'; फोनमध्ये दडलंय 'शेवटच्या टास्क'चं रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 11:45 IST2026-02-04T11:43:57+5:302026-02-04T11:45:06+5:30
मुली बऱ्याच काळापासून हा गेम खेळत होत्या आणि काल या गेमचा ५० वा म्हणजेच शेवटचा टास्क होता.

जीवघेणा 'कोरियन लव्हर' गेम! प्राची बनली 'डेथ कमांडर'; फोनमध्ये दडलंय 'शेवटच्या टास्क'चं रहस्य
गाझियाबादमधील 'भारत सिटी सोसायटी'मध्ये मध्यरात्री अडीचच्या सुमारास शांततेचं रूपांतर अचानक किंकाळ्यांमध्ये झालं, जेव्हा १६, १४ आणि १२ वर्षांच्या तीन बहिणींनी मिळून नवव्या मजल्यावरून उडी मारली. प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, तिन्ही बहिणी 'कोरियन लव्हर' नावाच्या एका टास्क-आधारित ऑनलाइन गेमला बळी पडल्या होत्या.
वडील चेतन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुली बऱ्याच काळापासून हा गेम खेळत होत्या आणि काल या गेमचा ५० वा म्हणजेच शेवटचा टास्क होता. हाच टास्क पूर्ण करण्यासाठी त्यांनी मृत्यूला कवटाळलं.
नवव्या मजल्याच्या बाल्कनीतून उडी मारण्यासाठी मुलींनी दोन पायऱ्यांचा आधार घेतला, जेणेकरून त्या रेलिंगच्या वर जाऊ शकतील. पोलीस तपासात असं निष्पन्न झालं आहे की, १४ वर्षांची प्राची (मधली बहीण) या गेमची लीडर होती. तीच सर्वांना आदेश द्यायची आणि तिघीही प्रत्येक काम एकत्र करायच्या.
पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यावर केवळ 'Mummy Papa Sorry' असं लिहिलं होतं. डीसीपी निमिष पाटील आणि एसीपी अतुल कुमार यांनी मुलींचे मोबाईल जप्त केले आहेत. पोलीस आता त्या 'कंट्रोलर' किंवा लिंकचा शोध घेत आहेत, ज्याने मुलांना हा गेम खेळण्यासाठी प्रवृत्त केलं. डिजिटल स्क्रीनच्या मागे आपल्या मुलींच्या मृत्यूची गोष्ट लिहिली जात आहे, याची पुसटशी कल्पनाही कुटुंबाला नव्हती.
एसीपी अतुल कुमार यांच्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिन्ही मुलींना (निशिका, प्राची, पाखी) रुग्णालयात नेलं, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. या मुली नक्की कोणाच्या संपर्कात होत्या, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.