दुहेरी हत्याकांड! कळमेश्वर तालुक्यात महिला-मुलीची हत्या करून आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 11:58 PM2021-09-27T23:58:08+5:302021-09-27T23:58:24+5:30

Crime News : ही थरारक घटना झुनकी शिवारात सोमवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर पंचक्रोशीत प्रचंड थरार निर्माण झाला.

Double murder! Accused absconding after killing a woman and a girl in Kalmeshwar taluka | दुहेरी हत्याकांड! कळमेश्वर तालुक्यात महिला-मुलीची हत्या करून आरोपी फरार

दुहेरी हत्याकांड! कळमेश्वर तालुक्यात महिला-मुलीची हत्या करून आरोपी फरार

googlenewsNext

कळमेश्वर - नागपूर : चार दिवसांपूर्वी कळमेश्वर तालुक्यातील शेतावर सालगडी म्हणून कामाला लागलेल्या एका आरोपीने त्याच्यासोबतच्या महिला आणि मुलीची निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना झुनकी शिवारात सोमवारी दुपारी उघडकीस आल्यानंतर पंचक्रोशीत प्रचंड थरार निर्माण झाला. कळमेश्वर - झुनकी मार्गावर श्रावण घोडपागे (रा. नागपूर) यांचे शेत आहे. हे शेत त्यांनी कळमेश्वर येथील ललित गजानन गणोरकर यांना ठेक्याने दिले आहे. 

चार दिवसापूर्वी २० ते ३० वयोगटातील महिला आणि तिची राणी नामक मुलगी वय (अंदाजे ८ वर्षे) या दोघींना घेऊन आरोपी राजेश शाहू ललित गणोरकर यांच्याकडे आला. त्याने शेतात काम करायची आणि तेथेच राहायची तयारी दाखविल्याने गणोरकर यांनी त्याला सालगडी म्हणून शेतातील कामावर ठेवून घेतले. शेतातील झोपडीतच राजेश आणि त्याच्यासोबतची महिला आणि मुलगी राहू लागली. दरम्यान, सोमवारी दुपारी ललित गणोरकर हे शेतात आले असता झोपडीमध्ये त्यांना महिला आणि मुलगी मृतावस्थेत आढळून आली. राजेश शाहू मात्र कुठेच दिसला नाही. त्यामुळे गणोरकर यांनी कळमेश्वर पोलिसांना कळविले. 

दुहेरी हत्याकांडाची माहिती कळताच कळमेश्वर पोलिसांचा ताफा, पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सरंबळकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अनिल जिट्टावार यांचे पथक आणि कळमेश्वरचे ठाणेदार आसिफ रजा शेख, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण मुंडे, उपनिरीक्षक शरद गायकवाड घटनास्थळी पोहोचले. या दुहेरी हत्याकांडाचे वृत्त कळमेश्वर-झुनकी पंचक्रोशीत वायुवेगाने पसरले. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी गणोरकर यांच्या शेताकडे धावली. 

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावर निरीक्षण केले असता दगड, पावशी आणि दोरी आढळली. प्राथमिक तपासात आरोपीने महिला, मुलीचा गळा आवळून तसेच शस्त्राचे वार करून दगडानेही ठेचल्याचे दिसून आले. त्यामुळे कळमेश्वर पोलिसांनी संशयित आरोपी राजेश शाहूविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी आणि मृतांचे संबंध अस्पष्ट
या घटनेतील संशयित आरोपी आणि मृत महिला व तिच्या मुलीच्या संबंधाबाबतही संशय आहे. ती त्याची पत्नी आहे की त्याने तिला फूस लावून पळवून आणले होते, याबाबतही पोलिसांचे वेगवेगळे मत आहे. आरोपीच्या अटकेनंतरच हा सर्व खुलासा होणार आहे.

पोलीस पथक मध्य प्रदेशकडे रवाना
हे थरारकांड रविवारी रात्रीनंतर घडले असावे, असा पोलिसांचा संशय आहे. संशयित आरोपी राजेश शाहू हा मूळचा मंडला जिल्ह्यातील नयनपूर, तिसगाव येथील रहिवासी आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक तिकडे रवाना झाले आहे.

Web Title: Double murder! Accused absconding after killing a woman and a girl in Kalmeshwar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.