भरदिवसा झोपण्याच्या जागेवरून बेघर कामगाराची निर्घृण हत्या; आरोपी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 19:38 IST2021-10-13T19:34:26+5:302021-10-13T19:38:05+5:30
Murder case : या घटनेने परिसरात काही काळ भयाचे वातावरण पसरले होते.

भरदिवसा झोपण्याच्या जागेवरून बेघर कामगाराची निर्घृण हत्या; आरोपी गजाआड
भिवंडीत दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असताना पद्मानगर श्रीरंग नगर या ठिकाणी भरदिवसा एका कामगाराची तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना बुधवारी घडली आहे. राजेंद्रप्रसाद शांतीप्रसाद वर्मा वय ३२ असे हत्या झालेल्या कामगाराचे नाव असून या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. तर आरोपी राजू उर्फ सहाजराम रामदास चौहान यास शहर पोलिसांनी अटक केली आहे.
मयत राजेंद्रप्रसाद बर्मा व हत्या करणारा राजू उर्फ सहाजराम रामदास चौहान हे दोघे ही फिरस्ते कामगार असून दोघेही बेघर असल्याने दिवसभर मोलमजुरी करून रात्री रस्त्याकडेला झोपत असत. त्यांच्या मध्ये झोपेच्या जागेवरून वाद झाल्याने त्याचा राग मनात धरून राजू उर्फ सहाजराम रामदास चौहान याने आपल्या जवळील तीक्ष्ण हत्याराने भर रस्त्यात आपल्याच मित्राच्या गळ्यावर, चेहऱ्यावर हातावर सपासप वार करून रक्तबंबाळ केले. ज्यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला असून तेथील नागरीकांनी आरोपीस पकडून ठेवत शहर पोलीस ठाण्यास याची खबर देताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीस ताब्यात घेत मृत कामगाराचे शव शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून आरोपी राजू उर्फ सहाजराम रामदास चौहान या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे . दरम्यान या घटनेने परिसरात काही काळ भयाचे वातावरण पसरले होते.