५० पर्यंत अंक लिहिता न आल्याने बाप झाला हैवान; ४ वर्षांच्या लेकीला लाटण्याने अमानुष मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 10:43 IST2026-01-24T10:42:49+5:302026-01-24T10:43:44+5:30

५० पर्यंत अंक लिहिता आले नाहीत म्हणून एका पित्याने आपल्या साडेचार वर्षांच्या मुलीला लाटण्याने इतकी अमानुष मारहाण केली की, त्यात तिचा मृत्यू झाला.

4 year old girl unable to count to 50 was beaten to death by her ruthless father | ५० पर्यंत अंक लिहिता न आल्याने बाप झाला हैवान; ४ वर्षांच्या लेकीला लाटण्याने अमानुष मारहाण

फोटो - ndtv.in

हरियाणातील फरीदाबादमधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ ५० पर्यंत अंक लिहिता आले नाहीत म्हणून एका पित्याने आपल्या साडेचार वर्षांच्या मुलीला लाटण्याने इतकी अमानुष मारहाण केली की, त्यात तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर आरोपीने पत्नीची दिशाभूल करण्यासाठी एक खोटी गोष्ट रचली. मुलगी खेळता खेळता पायऱ्यांवरून पडली, असा बनाव त्याने केला होता. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर सत्य समोर आले.

जेव्हा आई रुग्णालयात पोहोचली, तेव्हा तिला मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आणि चेहऱ्यावर निळे डाग दिसले. यामुळे तिला संशय आला आणि तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे सेक्टर-५६ क्राईम ब्रांचच्या पथकाने तपास सुरू केला. फरीदाबाद पोलीस प्रवक्ते यशपाल यांनी सांगितलं की, उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील खरंटिया गावातील रहिवासी कृष्णा जयस्वाल हा आपल्या पत्नी आणि मुलांसह फरीदाबादच्या झाडसेंतली गावात भाड्याने राहत होता. पती-पत्नी दोघेही एका खासगी कंपनीत नोकरी करतात.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिवसा कृष्णा घरी राहून मुलांची देखभाल करायचा. २१ जानेवारी रोजी तो आपल्या साडेचार वर्षांच्या मुलीला ५० पर्यंत अंक लिहिण्यास सांगत होता. जेव्हा मुलगी ते लिहू शकली नाही, तेव्हा त्याला अनावर राग आला आणि त्याने मुलीला लाटण्याने बेदम मारहाण केली. प्रचंड मारहाणीमुळे मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर कृष्णा तिला घेऊन सरकारी रुग्णालयात गेला, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. यानंतर त्याने पत्नीला फोन करून बोलावलं आणि मुलगी पायऱ्यांवरून पडल्याचं सांगितलं.

आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कृष्णाला ताब्यात घेतलं. पोलिसांनी कडक चौकशी केली असता, त्याने मुलीला मारहाण केल्याची कबुली दिली. आरोपीने सांगितलं की, मुलगी शाळेत जात नव्हती आणि तो तिला घरीच शिकवत होता. अंक लिहिता न आल्याने त्याला राग आला आणि तिला बेदम मारलं, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

Web Title : 50 तक अंक न लिख पाने पर पिता बना हैवान, बेटी की हत्या

Web Summary : फरीदाबाद में एक पिता ने 50 तक अंक न लिख पाने पर अपनी चार साल की बेटी को बेरहमी से पीटा, जिससे उसकी मौत हो गई। उसने पहले गिरने का बहाना किया, लेकिन अस्पताल में सच्चाई सामने आ गई। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है।

Web Title : Father Kills Daughter for Failing to Write Numbers to 50

Web Summary : In Faridabad, a father brutally beat his four-year-old daughter to death for failing to write numbers up to 50. He initially claimed she fell down stairs, but the truth emerged at the hospital. Police arrested the accused, who confessed to the crime.