रस्त्यावर कोसळताच मागील वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 15:52 IST2026-05-02T15:51:41+5:302026-05-02T15:52:04+5:30
रेल्वे उड्डाणपुलावर गुरुवारी रात्री अपघात, घटना पाहण्यासाठी गेलेला दुसरा तरुण पुलावरून कोसळून गंभीर जखमी

रस्त्यावर कोसळताच मागील वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले, तरुणाचा जागीच मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : वाळूजकडून शहराकडे येत असताना दुचाकीचा तोल जाऊन कोसळलेल्या राहुल आनंद बागुल (२४) याला मागून जाणाऱ्या सुसाट वाहनाने चिरडले. गुरुवारी रात्री छावणीच्या रेल्वे उड्डाणपुलावर घडलेल्या अपघातात राहुलचा जागीच मृत्यू झाल्याचे छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव यांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुकुंदवाडी रामनगर येथील रहिवासी राहुल गुरुवारी रात्री उशिरा वाळूजकडून शहराकडे येत होता. छावणीतील रेल्वे उड्डाणपुलावर नियंत्रण सुटून त्याची दुचाकी (एमएच २०- एच ई - ७२२०) घसरली. या तो रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या सुसाट वाहनाने त्याला चिरडले. स्थानिकांनी धाव घेत त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्याला चिरडणारे वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अपघात बघायला गेलं अन् पुलावरून कोसळलं
दरम्यान, याच अपघातादरम्यान कडूबा सोनवणे हा तरुण गंभीर जखमी झाला. रेल्वे उड्डाणपुलावर एका बाजूने हा अपघात झालेला असताना दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या कडूबा यांनी दुचाकी थांबवून रस्ता ओलांडून अपघातस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उड्डाणपुलावर येणाऱ्या आणि जाणाऱ्या रस्त्याच्या मधील जागेत जाऊन तो पुलावरून खाली कोसळला. यात कडूबा देखील गंभीर जखमी झाल्याचे निरीक्षण विवेक जाधव यांनी सांगितले.