३० वर्षांची प्रतीक्षा संपली; ३८ किमीचा प्रवास करून जायकवाडीचे पाणी छ. संभाजीनगराच्या वेशीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:18 IST2026-04-15T13:17:15+5:302026-04-15T13:18:36+5:30

३८ किमीचा प्रवास करून 'गोदामाय' शहराच्या वेशीवर; नव्या जलवाहिनीतून पाणी दाखल.

The 30-year wait is over; After traveling 38 km, Jayakwadi water reaches the gate of Chhatrapati Sambhajinagar | ३० वर्षांची प्रतीक्षा संपली; ३८ किमीचा प्रवास करून जायकवाडीचे पाणी छ. संभाजीनगराच्या वेशीवर

३० वर्षांची प्रतीक्षा संपली; ३८ किमीचा प्रवास करून जायकवाडीचे पाणी छ. संभाजीनगराच्या वेशीवर

छत्रपती संभाजीनगर : शहरातील १८ लाखांहून अधिक नागरिकांचे लक्ष नवीन पाणीपुरवठा योजनेकडे लागले होते. ३० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधत जायकवाडीचे पाणी नक्षत्रवाडीच्या जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत यशस्वीपणे आणले. पाणी येताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका, ‘जीव्हीपीआर’ कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आतषबाजी करीत जल्लोष केला. पाच वर्षांच्या अथक मेहनतीनंतर हे पाणी आले. जायकवाडीचे पांढरेशुभ्र पाणी पाहून अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. शहरवासीयांच्या नळापर्यंत अतिरिक्त पाणी येण्यासाठी आणखी एक महिना लागेल. ज्या भागात नवीन जलवाहिन्या टाकल्या आहेत, तेथे पाणी येण्यास किमान दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

२३ मार्चपासून २५०० मिमी व्यासाच्या नवीन जलवाहिनीची टेस्टिंग सुरू होती. मंगळवारी सकाळी १०:०० वाजता नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पडेल यादृष्टीने नियोजन करण्यात आले होते. पाणी १:५० वाजता आले. पाणी जलशुद्धीकरण केंद्रात धो-धो पडू लागताच चारही बाजूंनी फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘हर हर महादेव’, ‘गोदामायचा जयजयकार’ केला. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी जलपूजन केले. यावेळी मजिप्राच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे, ‘जीव्हीपीआर’ कंपनीचे महेंद्र गोगलथू यांची प्रमुख उपस्थिती होती. २:४५ वाजेपर्यंत पाणी सुरू ठेवण्यात आले. त्यानंतर उपसा बंद केला.

८६ फूट उंचीवर पाणी
नक्षत्रवाडी मुख्य रस्त्यापासून जलशुद्धीकरण केंद्र तब्बल ८६ फूट उंचीवर आहे. त्यामुळे पाणी वरपर्यंत नेण्यासाठी मंगळवारी सकाळी योग्य नियोजन केले हाेते. पाण्याच्या प्रेशरमुळे कुठेही व्हॉल्व्हला, जलवाहिनीला लिकेज आढळून आले नाही. त्यामुळे शहरात पाणी आणण्याचा प्रयोग यशस्वी झाला.

आता जलवाहिनीचे उलट शुद्धीकरण
आतापर्यंत जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत शुद्ध करण्यात आली. उद्यापासून नक्षत्रवाडीपासून जायकवाडीपर्यंत उलट दिशेने पाण्याच्या संपूर्ण प्रेशरचा वापर करीत जलवाहिनी शुद्ध केली जाईल. प्रत्येक ४ ते ६ किमी अंतरावर स्कोअर व्हॉल्व्ह ओपन करून पाणी सोडले जाईल.

एक महिन्यात शहराला पाणी
जलशुद्धीकरण केंद्राची टेस्टिंग करण्यापूर्वी काही लहान-लहान कामे पूर्ण केली जातील. ही कामे पूर्ण होताच आठ ते दहा दिवस दररोज शुद्धीकरण, क्लोरिन मिक्सर प्लांट, त्याचे लायसन्स मिळवणे आदी कामे करून शहरात पाणी आणले जाईल. मनपाच्या जुन्या ‘एमबीआर’ला ५० ते ६० एमएलडी वाढीव पाणी दिले जाईल. ज्यामुळे नागरिकांना किमान दोन ते तीन दिवसांआड पाणी मिळेल. ज्या भागात नवीन जलवाहिन्या टाकल्या त्या भागाला उशिरा पाणी मिळेल.

पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण
जायकवाडी ते नक्षत्रवाडी ३८ किमी पाणी आणणे खूप महत्त्वाचे होते. यापुढे शहरात पाणी आणणे मोठे आव्हानात्मक आहे. शहरात १५०० मिमी व्यासाची एक मोठी जलवाहिनी टाकलेली आहे. त्याचा वापर करणार आहोत. ५ जलकुंभ वापरले जातील. योजनेसाठी शासन, सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभले. एक रोडमॅप तयार करून वर्षभरात योजना पूर्ण केली जाईल.
- अमोल येडगे, मनपा आयुक्त

आज खूप आनंदाचा क्षण
अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर शहरात पाणी आणल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. शासनाचे माेठे पाठबळ मिळाले. अनेक तांत्रिक अडचणींवर मात केली. पुढे शहरात पाणी आणण्यासाठी मुख्य जलवाहिन्यांवर बटरफ्लाय व्हॉल्व्ह बसविणे, क्रॉस कनेक्शन, जलकुंभापर्यंतचे कनेक्शन आदी कामे करण्यात येतील. वाढीव पाणी मनपाच्या जुन्या ‘एमबीआर’ला देऊन पाणी वाढविले जाईल. त्यामुळे शहराला मोठा दिलासा मिळेल.
- मनीषा पलांडे, मुख्य अभियंता, मजिप्रा.

रात्रंदिवस केलेल्या मेहनतीचे फळ
रात्रंदिवस केलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. २०२३ पासून आजपर्यंत आम्ही फक्त आणि फक्त काम करीत आलोय. शहराला पाणी देणे हेच आमचे ध्येय आहे. लाखो नागरिकांची तहान भागविण्याचे सौभाग्य आम्हाला मिळाले. लवकरात लवकर नागरिकांना पाणी कसे देता येईल, यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- महेंद्र गोगलोथू, जनरल मॅनेजर, ‘जीव्हीपीआर.’

Web Title : 30 साल के इंतजार के बाद छत्रपति संभाजीनगर पहुंचा जायकवाड़ी का पानी

Web Summary : 30 वर्षों के बाद, जायकवाड़ी का पानी छत्रपति संभाजीनगर पहुंचा, जिससे 18 लाख निवासियों को लाभ होगा। जल शोधन केंद्र तक पानी सफलतापूर्वक पहुंचने पर जश्न मनाया गया। पूर्ण जल आपूर्ति में एक और महीना लगेगा, नए क्षेत्रों को दिवाली तक कनेक्शन का इंतजार है। यह शहर के जल अवसंरचना के लिए एक महत्वपूर्ण कदम है।

Web Title : Jaikwadi Water Reaches Chhatrapati Sambhajinagar After 30-Year Wait

Web Summary : After 30 years, Jaikwadi water reached Chhatrapati Sambhajinagar, benefiting 1.8 million residents. Celebrations erupted as the water successfully reached the purification center. Full water supply will take another month, with new areas awaiting connections until Diwali. This marks a crucial step forward for the city's water infrastructure.