‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:17 IST2026-04-16T09:15:56+5:302026-04-16T09:17:14+5:30
America Iran War: होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी यशस्वी होऊ शकतात.

‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
America Iran War: इराणविरुद्धच्या युद्धाचा शेवट जवळ आला असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असतानाच, इराणी बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे अंमलात आणल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडने दिली आहे. दरम्यान, युद्धविराम वाढवण्यासाठी मध्यस्थांचे प्रयत्न सुरू असून दोन्ही देश पुन्हा चर्चेच्या टेबलावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, नाकेबंदीमुळे संतापलेल्या इराणने आखातातील व्यापार रोखण्याचा इशारा दिला आहे. २२ एप्रिलपर्यंत लागू असलेल्या युद्धविरामाचा कालावधी किमान दोन आठवड्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील वाटाघाटी यशस्वी होऊ शकतात. तेहरानमधील एका सूत्राने म्हटले आहे की, अमेरिकेसोबत झालेल्या चर्चेत मांडलेल्या प्रस्तावांचा एक भाग म्हणून पुढील संघर्ष टाळण्यासाठी करार झाल्यास इराण हल्ल्याच्या धोक्याशिवाय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या ओमानच्या बाजूने जाण्याची परवानगी देण्याचा विचार करू शकतो.
जलक्षेत्रात पेरलेले सुरुंग हटवण्यास इराण सहमत होईल की नाही
नाव न सांगण्याच्या अटीवर सूत्रांनी सांगितले की, इराणकडून कोणताही अडथळा न आणता अरुंद सामुद्रधुनीच्या पलीकडून ओमानच्या सागरी हद्दीतून जहाजांना जाण्याची परवानगी देण्यास तयार असू शकतो. परंतु, त्या जलक्षेत्रात पेरलेले सुरुंग हटवण्यास इराण सहमत होईल की नाही, सर्व जहाजांना कोणत्याही अडथळ्याशिवाय जाण्याची परवानगी दिली जाईल की नाही, हे सूत्राने सांगितले नाही. अमेरिका-इस्रायल-इराण युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, इराणच्या प्रस्तावामुळे जहाजांना ओमानच्या सागरी हद्दीतून कोणत्याही अडथळ्याशिवाय जाण्याची परवानगी मिळेल, ज्यामुळे अरुंद सामुद्रधुनीमध्ये एक सुरक्षित मार्ग तयार होईल, याबाबत मीडिया रिपोर्टमधून दावे केले जात आहे. असे असले तरी, काही महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत. इराण त्या भागात पेरलेले सुरुंग हटवणार की नाही, किंवा इस्रायलशी संबंधित जहाजांसह सर्व जहाजांना जाण्याची परवानगी दिली जाईल की नाही, हे अस्पष्ट आहे.