ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:42 IST2026-04-16T09:40:06+5:302026-04-16T09:42:40+5:30
America Iran War: पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा शांतता चर्चा पुढे नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
America Iran War: पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह इराणमध्ये दाखल झाले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थी घडवून आणण्यासाठी इस्लामाबादकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात इस्लामाबादमध्ये सुमारे २१ तास चाललेल्या चर्चेतून कोणताही करार होऊ शकला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.
इराणविरुद्धच्या युद्धाचा शेवट जवळ आला असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असतानाच, इराणी बंदरांवरील अमेरिकेची नाकेबंदी पूर्णपणे अंमलात आणल्याची माहिती यूएस सेंट्रल कमांडने दिली आहे. दरम्यान, युद्धविराम वाढवण्यासाठी मध्यस्थांचे प्रयत्न सुरू असून दोन्ही देश पुन्हा चर्चेच्या टेबलावर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, नाकेबंदीमुळे संतापलेल्या इराणने आखातातील व्यापार रोखण्याचा इशारा दिला आहे. २२ एप्रिलपर्यंत लागू असलेल्या युद्धविरामाचा कालावधी किमान दोन आठवड्यांनी वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पाकिस्तानच्या शिष्टमंडळाचे इराणने केले स्वागत
पाकिस्तानी लष्कराने सांगितले की, आसिम मुनीर हे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्यासह इराणमध्ये असलेल्या शिष्टमंडळाचा भाग आहेत. दोन्ही बाजूंमध्ये संदेशांची देवाणघेवाण करणे आणि चर्चेच्या पुढील फेरीसाठी पार्श्वभूमी तयार करण्यास मदत करणे, हा या भेटीचा उद्देश आहे. इस्लामाबादमध्ये पुन्हा एकदा चर्चेचे आयोजित केली जाऊ शकते. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे स्वागत केले.
दरम्यान, इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, चर्चा अयशस्वी झाली असली तरी, पाकिस्तानच्या माध्यमातून वाटाघाटी सुरू आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यातील दरी कमी करण्याची भूमिका आसिम मुनीर यांची आहे. येत्या काही दिवसांत परस्पर मान्यतेचा करार होऊ शकतो का, हे दोन्ही पक्ष अजूनही निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत.