गाड्या उचलण्याच्या नादात सुसाट टोईंग व्हॅनची दोन कारला धडक, पथकाची नागरिकांनाच अरेरावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 20:13 IST2026-05-02T20:09:57+5:302026-05-02T20:13:08+5:30
मनपाचे नागरी पथक शिस्त लावण्यासाठी की जीव घेण्यासाठी ? प्रोझोन मॉलसमोरील थरार; माय-लेक थोडक्यात वाचले

गाड्या उचलण्याच्या नादात सुसाट टोईंग व्हॅनची दोन कारला धडक, पथकाची नागरिकांनाच अरेरावी
छत्रपती संभाजीनगर : गाड्या उचलण्याच्या नादात मनपाच्या टाेईंग व्हॅनने रस्त्याच्या कडेला उभ्या नागरिकांच्या अंगावर गाडी घातली. त्यात एक फळविक्रेता गंभीर जखमी झाला तर दोन कारचे नुकसान होत दुचाकीस्वार आई व मुलगा बालंबाल बचावले. विशेष म्हणजे, अपघातानंतरही या नागरी पथकातील माजी सैनिकांनी नेहमीप्रमाणे नागरिकांनाच अरेरावी केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. गुरुवारी दुपारी ३ वाजता प्रोझोन मॉल मार्गावरील मॉस्को कॉर्नरवर हा अपघात घडला.
शहरातील रस्त्यांच्या कडेला, बेशिस्तपणे उभ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी नागरी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना आहेत. गुरुवारी दुपारी नेहमीप्रमाणे हे पथक मॉस्को कॉर्नर ते एपीआय कॉर्नर परिसरात कारवाईसाठी फिरत होते. कार जप्त करून टोईंग व्हॅनचा चालक संतोष पवार गरवारे मैदानाच्या दिशेने भरधाव निघाला. मॉल ओलांडताच त्याचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले व त्याने थेट दुचाकीस्वार फळविक्रेते लक्ष्मण भाऊसाहेब निकम (३६, जय भवानीनगर) यांना उडविले. निकम दूरवर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. त्यांची सर्व फळे रस्त्यावर फेकली गेली. त्यानंतर व्हॅन रस्त्याच्या कडेला उभ्या दोन कारवर जाऊन धडकली.
नागरिक भयभीत, पळापळ
या अपघाताचा परिसरात मोठा आवाज झाला. व्हॅन थेट वाहनांना उडवत गेल्याने गाेंधळ उडाला. तेथेच उभ्या शीला दाभाडे व त्यांचा मुलगा अलोक बालंबाल वाचले. घटनेची माहिती कळताच नगरसेवक शिवाजी दांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. बळिराम पांडुरंग पठाडे (एम एच -२० -ईवाय-९१०९), बजरंग नावंदर (एम एच -२० -डीव्ही-६८८६), शीला दाभाडे (एम एच -२० -एचजी २७२४) यांच्या वाहनांचे नुकसान झाले. जखमी लक्ष्मण निकम यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जवानांची नागरिकांवरच दादागिरी
अपघातानंतर चूक असतानाही नागरी पथकाने स्थानिकांवरच दादागिरी केली. आवाज चढवून शासकीय कर्मचारी असल्याच्या तोऱ्यात ते गप्प बसण्यासाठी इशारे करत होते. त्यांच्या या मुजोर वागण्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
मनपाच्या कर्मचारी, अधिकाऱ्यांचा वेग सुसाट
तीन आठवड्यांपूर्वी मनपाच्या एका सुसाट हायवाचालकाने भडकल गेट परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाला चिरडून मारले. त्याच्याच दोन आठवड्यानंतर मुकुंदवाडीत मनपाच्या हायवाने दुचाकीस्वाराला चिरडले होते. त्यामुळे मनपाच्या या मुजोर कर्मचाऱ्यांना आवर कोण घालणार, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
अधिकारावरून पुन्हा प्रश्नचिन्ह
नागरी पथकाकडून बेकायदेशीर पार्किंगच्या नावाखाली दुचाकी, चारचाकी जप्त केल्या जातात. टोईंग व्हॅनला अंबर दिवा लावून कार ओढून नेतात. प्रत्यक्षात कायद्यानुसार या पथकाला असा कुठलाही अधिकार नसल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र तरीही नागरी पथकाकडून वाहने जप्त करून दामदुप्पट दंड वसूल करून नागरिकांना उद्धट भाषा वापरली जाते. त्यांच्या या वागणुकीवरूनही सामान्यांमधून सातत्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.