गुन्हेगारांसमोर पोलिस हतबल; ४८ तासांत चोऱ्या, सशस्त्र लुटमारीने छत्रपती संभाजीनगर हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 13:49 IST2026-04-15T13:44:08+5:302026-04-15T13:49:27+5:30
गुन्हे शाखेसह स्थानिक पोलिस सपशेल अपयशी, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह

गुन्हेगारांसमोर पोलिस हतबल; ४८ तासांत चोऱ्या, सशस्त्र लुटमारीने छत्रपती संभाजीनगर हादरले
छत्रपती संभाजीनगर : शहरात लुटमार, घरफोड्या, दुचाकीच्या चोऱ्या या घटनांमध्ये विक्रमी वाढ होत असतानाच गुन्हेगार आता पोलिसांच्या नाकावर टिच्चून धुमाकूळ घालत आहेत. गेल्या ४८ तासांत शहराच्या विविध भागांत झालेल्या घरफोड्या, सशस्त्र दरोडे आणि सोनसाखळी चोरीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. विशेष म्हणजे, भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी गुन्हेगार राजरोसपणे लूट करत असताना, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचा वचक शून्य झाल्याचे पहायला मिळत आहे. पोलिस आयुक्तालयाच्या कागदी आदेशांचा गुन्हेगारांना जराही धाक उरलेला नसल्याने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
संगणक खरेदी, दुरूस्ती व्यावसायिक विलास गाढे (५६, रा. मयूर पार्क) हे पडेगावस्थित नातलगाच्या वास्तुशांतीसाठी १२ एप्रिलला दुपारी १ वाजता सहकुटुंब गेले होते. २.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा विपुल याला घराचे मुख्य गेट उघडे व मुख्य दरवाजाचा कोंडा तुटलेला आढळला. चोरांनी बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडले होते. यात १८,६०० रुपयांचे विदेशी चलन, २५ हजार रोख रकमेसह जवळपास ८ तोळे सोने-चांदीचे दागिने, बँकेची महत्त्वपूर्ण कागदपत्रेही चोरून नेली. घटना कळताच हर्सूल ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्वाती केदार, उपनिरीक्षक सचिन पागोटे यांनी धाव घेतली.
मुलींच्या हॉस्टेलमध्ये चोरांचा वावर
गारखेड्यातील भगतसिंगनगरमधून चोरांनी ४१ हजारांचे बांधकाम साहित्य लंपास केले. १३ एप्रिलला सकाळी ८ वाजता ही चाेरी उघडकीस आली. तर देवगिरी महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात चोरांनी प्रवेश करुन विद्यार्थिनींचे मोबाईल लंपास केले.
सोनसाखळी लुटमारीचे सत्र थांबेना
- १२ एप्रिलला सेवानिवृत्त शिक्षिका शारदा उत्तरवार या तापडिया नाट्यमंदिरात एका प्रवचनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या असता गर्दीत चोराने त्यांचे १३ ग्रॅमचे गंठण लंपास केले.
- १२ एप्रिलला अनिता घोलप या रात्री ११.३० वाजता बजरंग नगरच्या दिशेने पायी जात असताना दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील १३ ग्रॅमची सोनसाखळी हिसकावून पसार झाला.
- १३ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता कृष्णा गायके यांची पत्नी घाणेगावच्या यात्रेत सहभागी झाली होती. यात्रेच्या गर्दीतून चोरांनी त्यांचे मंगळसूत्र लंपास केले.
मुलीला चाकूचा धाक दाखवत लुटले
वाळूज ठाण्याच्या हद्दीतील मांडवा गावातील एका कुटुंबाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्यात आली. शांत इंगळे हे १३ एप्रिलला रात्री २ वाजता घराबाहेर उभे असताना अज्ञातांनी अचानक त्यांच्या गळ्याला चाकू लावला. घरात घुसून दुसऱ्याने त्यांच्या लहान मुलीच्या गळ्याला चाकू लावून सर्व ऐवज देण्यासाठी धमकावले. मुलीमुळे भयभीत झालेल्या इंगळे यांनी सर्व ऐवज घेऊन जा, पण मुलीला काही करु नका, अशी विनंती केली. त्यानंतर तिघांपैकी दोघांनी घरातील दोन तोळे सोन्याचे दागिने व अडीच लाख रुपये घेऊन पसार झाले. वाळूज पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
वरिष्ठांकडून विचारणाच नाही
गेल्या सहा महिन्यांत शहरात सोनसाखळी, घरफोड्यांच्या विक्रमी घटना घडल्या. जवाहरनगर, सातारा, पुंडलिकनगर, मुकुंदवाडी, एमआयडीसी वाळूज हद्दीतून सातत्याने सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. परंतु यातील एकाही घटनेची गुन्हे शाखा, स्थानिक पोलिस उकल करु शकलेले नाही. विशेष म्हणजे, पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्तांकडून देखील याबाबत विचारणा होत नसल्याने खालचे अधिकारी सुस्तावल्याची चर्चा आहे.