उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 08:36 IST2026-04-16T08:35:20+5:302026-04-16T08:36:05+5:30
Electricity: वीज स्वस्त असल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने वीज विक्रीवरील करात प्रतियुनिट ९.९० पैशांची वाढ केली आहे. ही अतिरिक्त वसुली औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून करण्यात येणार आहे.

उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
नागपूर - वीज स्वस्त असल्याचा दावा करणाऱ्या राज्य सरकारने वीज विक्रीवरील करात प्रतियुनिट ९.९० पैशांची वाढ केली आहे. ही अतिरिक्त वसुली औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांकडून करण्यात येणार आहे.
महावितरणने १ डिसेंबरपासून ही वसुली लागू झाल्याची घोषणा केली. आता औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडून विक्री कर म्हणून प्रतियुनिट अनुक्रमे २८.९४ पैसे आणि २७.९० पैसे आकारले जातील. यापूर्वी हा दर अनुक्रमे १९.०४ पैसे आणि १८.०० पैसे होता.
राज्यातून उद्योग इतर राज्यांत जाण्याची भीती
ऊर्जातज्ज्ञ महेंद्र जिचकर यांनी सांगितले की, महाराष्ट्रात वीजदर तुलनेने आधीच जास्त आहेत. उद्योगांना वीजदर आणखी कमी होण्याची अपेक्षा होती; मात्र कर वाढवून वीज आणखी महाग करण्यात आली आहे. यामुळे राज्यातून उद्योगांचे पलायन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विक्रीकराच्या रकमेचा उपयाेग शेतकऱ्यांसाठी
विजेवरील विक्रीकर राज्य सरकारच्या खात्यात जमा होताे. करातील या वाढीचा उपयोग राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेसाठी केला जाणार आहे.
याआधीच रूफटॉप सोलर बसवून सौरऊर्जेचा वापर करणाऱ्या उद्योगांवर ग्रिड सपोर्ट चार्ज आणि टीओडी नियमांतील बदलांमुळे आर्थिक
ताण वाढला आहे. त्यामुळे त्यांचे वीजबिल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. आता इतर उद्योगांसह व्यावसायिक ग्राहकांवरही या करवाढीचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.