नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 09:34 IST2026-04-16T09:18:20+5:302026-04-16T09:34:34+5:30
नाशिक धर्मांतरण प्रकरणात आरोपी निदा खान संदर्भात धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
Nashik TCS Case:नाशिकमधील टीसीएस कंपनीच्या धर्मांतरण आणि शोषण प्रकरणाने आता एक भयानक वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ही अद्याप फरार असून, तिचे धागेदोरे थेट दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंड डॉ. शाहीन शाहिदशी जुळले असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. या गंभीर इनपुटमुळे महाराष्ट्र एटीएस आणि केंद्रीय तपास यंत्रणा हायअलर्टवर आल्या आहेत.
नाशिकमधील टीसीएस कंपनीत कनिष्ठ स्तरावर काम करणाऱ्या हिंदू तरुणींना लक्ष्य केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. वरिष्ठ एचआर पदावर कार्यरत असलेल्या निदा खानने एका सुनियोजित कटाद्वारे या तरुणींचे आधी लैंगिक शोषण केले आणि त्यानंतर धर्मांतरासाठी त्यांच्यावर दबाव टाकला असा आरोप आहे. या प्रकरणी अनेक एफआयआर दाखल करण्यात आले असून सात कर्मचाऱ्यांना अटकही झाली आहे.
डॉ. शाहीन आणि निदा खानचे कनेक्शन?
तपास यंत्रणांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित डॉ. शाहीन शाहिदसोबत वैचारिक किंवा संवाद स्तरावर संबंध असू शकतात. अल-फलाह युनिव्हर्सिटीशी संबंधित एका जुन्या प्रकरणात शाहीनचे नाव समोर आले होते. निदा आणि शाहीन यांच्यात कधी कॉल किंवा इंटरनेटच्या माध्यमातून संवाद झाला होता का? धर्मांतराच्या या नेटवर्कचा वापर देशविघातक कृत्य किंवा फंडिंगसाठी केला जात होता का? नाशिकचे धर्मांतरण नेटवर्क आणि अल-फलाह युनिव्हर्सिटी प्रकरण यात काही संबंध आहे का? याचा तपास एसआयटी करत आहे.
मुख्य आरोपी निदा खान सध्या फरार असून तिच्या आर्थिक व्यवहारांचा यंत्रणांकडून बारकाईने तपासणी केली जात आहे. "निदा खानच्या अटकेनंतर या संपूर्ण जाळ्याचा आणि संभाव्य दहशतवादी कनेक्शनचा मोठा खुलासा होऊ शकतो, असा विश्वास एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे.