चार हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 15:54 IST2019-09-19T15:52:54+5:302019-09-19T15:54:45+5:30

तक्रार अर्जानुसार कारवाई न करण्यासाठी लाच

Police arrest for taking four thousand bribe | चार हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार अटकेत

चार हजाराची लाच घेताना पोलीस हवालदार अटकेत

औरंगाबाद: तक्रार अर्जानुसार कारवाई न करण्यासाठी एका जणाकडून चार हजार रुपये लाच घेताना हर्सूल पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई हर्सूल ठाण्याच्या परिसरात १९ सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात आली.

पोहेकाँ सतीश यशवंतराव जाधव (बक्कल नंबर ६०९)असे अटकेतील आरोपी पोलिसाचे नाव आहे. प्राप्त माहिती अशी की, शहरातील रहिवासी तक्रारदार यांच्याविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल झाला होता. हा अर्ज चौकशीसाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश जाधव यांच्याकडे होता. पोहेकॉ जाधव यांनी तक्रारदार यांना ठाण्यात बोलावले होते. त्यावेळी त्यांनी तुझ्याविरोधात आलेल्या अर्जाची अधिक चौकशी न करता अर्ज निकाली काढण्यासाठी चार हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याविषयी तक्रार नोंदविली.

यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक विकास घनवट आणि कर्मचाऱ्यांनी दोन पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. तेव्हा दोन पंचासमक्षही पोहेकॉ जाधव यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांच्याकडून चार हजार रुपये त्यांनी घेतले. लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या साध्या वेशातील एसीबीच्या पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले. हर्सूल ठाण्यात पोहेकॉ जाधवविरोधात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Police arrest for taking four thousand bribe