- विकास राऊत
छत्रपती संभाजीनगर : सोलापूर ते धुळे या महामार्ग क्रमांक २११ वरील कन्नड आणि चाळीसगावमधील औट्रम घाटातील १३ कि.मी. अंतरात बोगद्याच्या कामासाठी नव्याने डीपीआर करण्यात येत आहे. १६ वर्षांपासून काम मंजूर करणे, रद्द करणे, पर्यायी मार्ग शोधणे, पुन्हा डीपीआर करणे, रेल्वे आणि बोगदा सोबत करणे, असा या बोगद्याच्या कामाचा प्रवास होत गेला.
साडेपाच ते ६ ते ७ हजार कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च गेला आहे. २०१० ते २०२६ पर्यंत असा १६ वर्षांपासून या घाटाचा वनवास सुरू असून, अपघातांमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सध्या एनएचएआयने चौथ्यांदा डीपीआरचे काम हाती घेतले आहे. २०११ मध्ये एनएच २११ या महामार्गाच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून धुळे-छत्रपती संभाजीनगर ते येडशी हा मार्ग एनएचएआयकडे औट्रम घाटासह हस्तांतरित झाला. तीन वर्षांपासून घाटातील जड वाहतूक बंद आहे.
ऑक्टोबरपर्यंत निविदा
औट्रम घाटातील बोगद्याच्या प्रकल्पाच्या डीपीआरचे काम सुरू आहे. १३ कि.मी. अंतरात घाटात बोगदा असून, ऑक्टोबर २०२६ पर्यंत निविदा अंतिम होतील, असे प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाची दोनपैकी एक परवानगी मिळाली आहे.
-अमरीश मानकर, प्रकल्प संचालक, एनएचएआय
बोगद्याच्या वाट्याला घोषणाच
२०११ : एनएच-२११ च्या कामात २ हजार कोटींतून बोगद्याची घोषणा.
२०१२ : १५ पैकी ११.५ कि.मी.काम करण्याचे ठरले.
२०१३ : डीपीआरला विलंब झाल्यामुळे चर्चेला विराम.
२०१४ : ७ किमी अंतरात बोगद्याचे काम करण्याचा विचार पुढे.
२०१५ : साडेचार किमी अंतराचे काम मूळ डीपीआरमधून कमी.
२०१६ : ५०० कोटींचा खर्च कमी करण्याचा घाट.
२०१७ : पुन्हा डीपीआर नव्याने करण्याचा निर्णय.
२०१८ : डीपीआरवर मंजुरीसाठी मुख्यालयात, निर्णय अधांतरी.
२०१९ : घाटातील बोगद्याचे काम रद्द करून पर्यायी मार्गाचा विचार.
२०२० : ३५०० कोटींवरून ५५०० कोटींवर बोगद्याच्या कामाचा खर्च.
२०२२ : ४०० कोटींतून घाटात चौपदरी रस्ता करण्याचा विचार पुढे.
२०२२ : अखेरीस रस्ता चौपदरीकरणासाठी एनएचएआयने निविदा मागविल्या.
२०२३ : औट्रम बोगद्याचे काम रद्द करण्याचा निर्णय.
२०२४ : बोगद्याच्या कामाचा खर्च १६ वर्षांत ६ ते ७ हजार कोटींवर गेला.
२०२५: बोगद्यासह रेल्वे मार्गाचा प्रस्ताव रद्द, बोगद्यासाठी डीपीआरच्या सूचना.
१६ वर्षांत किती झाले डीपीआर?
पहिल्या डीपीआरमध्ये २३ हजार मीटर डोंगर कापून त्यातील दगड बाहेर काढणे प्रस्तावित होते. त्यानंतर पुन्हा दाेन डीपीआरचे काम हाती घेतले. त्यात मशीनच्या साह्याने १४ हजार मीटर डोंगर फोडण्यासह काँक्रिटीकरण करणे, वरील भाग अर्धचंद्राकारात कापणे, बोगद्यातील इलेक्ट्रिसिटीचे काम करणे, व्हेंटिलेशन सुविधेसह हॉस्पिटल बांधण्याचे कामांचा समावेश होता. सध्या चौथ्या डीपीआरचे काम सुरू आहे. डीपीआरवरच कोट्यवधींचा खर्च झाला आहे.
Web Summary : The Outram Ghat tunnel project on the Solapur-Dhule highway faces delays. For 16 years, approvals, cancellations, and redesigns plagued the project. Costs escalated to ₹7,000 crore. A fourth DPR is now underway for the 13 km tunnel.
Web Summary : सोलापुर-धुले राजमार्ग पर औट्रम घाट सुरंग परियोजना में देरी हो रही है। 16 वर्षों से, अनुमोदन, रद्द और पुन: डिजाइन ने परियोजना को त्रस्त कर दिया है। लागत बढ़कर ₹7,000 करोड़ हो गई। 13 किमी सुरंग के लिए अब चौथा डीपीआर चल रहा है।