पाण्यासाठी शेतकऱ्यांचे ‘झोपा काढा’ आंदोलन

By Admin | Updated: November 4, 2014 01:40 IST2014-11-04T01:35:45+5:302014-11-04T01:40:18+5:30

औरंगाबाद : पैठण तालुक्यातील आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात जायकवाडीतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारपासून लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या

Movement of the farmers 'sleeping' movement for water | पाण्यासाठी शेतकऱ्यांचे ‘झोपा काढा’ आंदोलन

पाण्यासाठी शेतकऱ्यांचे ‘झोपा काढा’ आंदोलन


औरंगाबाद : पैठण तालुक्यातील आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यात जायकवाडीतून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी सोमवारपासून लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन केले. दिवसभर कोणताही निर्णय न झाल्यामुळे रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते. पाणी सोडण्याचा निर्णय जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले.
पावसाळ्यानंतरही यंदा आपेगाव आणि हिरडपुरी बंधारे रिकामेच आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी अडचणीत आले आहेत. लगतच्या गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. म्हणून या बंधाऱ्यांमध्ये जायकवाडीतून पाणी सोडण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत आहे. त्यासाठी आठवडाभरापूर्वी शेतकऱ्यांनी कडा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले. तरीही निर्णय झाला नाही. त्यामुळे आजपासून शेतकऱ्यांनी कडा कार्यालयासमोर झोपा काढा आंदोलन सुरू केले.
पैठण तालुक्यातील शेकडो शेतकरी दुपारीच येथे दाखल झाले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारात अंथरूण टाकून हे शेतकरी झोपले. सायंकाळी प्रभारी मुख्य अभियंता एन.व्ही. शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. निर्णय होण्यासाठी वेळ लागेल, असे त्यांनी आंदोलकांना सांगितले. यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले. रात्री उशिरापर्यंत शेतकरी कार्यालयासमोर झोपलेले होते.

Web Title: Movement of the farmers 'sleeping' movement for water