दंगलीतील आरोपी ड्रग्सच्या धंद्यात! दोन सख्ख्या भावांना अटक; ११२ नक्षेच्या बाटल्या जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 19:20 IST2026-04-22T19:19:40+5:302026-04-22T19:20:25+5:30
जामिनावर बाहेर अन् पुन्हा गुन्हेगारीत सक्रिय! वेगाने जाणाऱ्या रिक्षात आढळला नशेच्या बाटल्यांचा साठा; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या.

दंगलीतील आरोपी ड्रग्सच्या धंद्यात! दोन सख्ख्या भावांना अटक; ११२ नक्षेच्या बाटल्या जप्त
छत्रपती संभाजीनगर : एकीकडे अमली पदार्थांच्या मोठ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात असताना रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी यात पाऊल ठेवत नव्याने विक्री सुरू केली आहे. किराडपुरा दंगलीतील आरोपी मोहम्मद उस्मान अब्दुल सलाम मोकाती (वय २४) हा सख्खा भाऊ मोहम्मद सोफियान अब्दुल सलाम मोकाती (३३, दोघे रा. चाऊस कॉलनी) याच्यासोबत नशेच्या पातळ औषधांच्या बाटल्या विक्री करण्यासाठी घेऊन जाताना रंगेहाथ सापडला. गुन्हे शाखेने त्यांना सोमवारी मध्यरात्री अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरात शहर पोलिसांनी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या नेतृत्वात अमली पदार्थांविरोधात परिणामकारक कारवाया केल्या. यामुळे बड्या तस्करांचे धाबे दणाणले. २० एप्रिल रोजी मध्यरात्री १२:३० वाजता गुन्हे शाखेचे अधिकारी गस्तीवर असताना पंचायत समितीसमाेरून एक संशयित रिक्षा वेगाने जाताना दिसली. उपनिरीक्षक संदीप काळे, अभिजित चिखलीकर यांनी पाठलाग करून चालकाला थांबविले. तेव्हा रिक्षात नशेसाठीच्या पातळ औषधांच्या ११२ बाटल्यांचा बॉक्स आढळून आला. घटनेची माहिती कळताच जिन्सीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी धाव घेतली. अंमलदार संदीप तायडे, संताेष पारधे, मनोज विखणकर, बाळु नागरे यांनी चालक उस्मानला ताब्यात घेतले.
२०२३ च्या दंगलीत होता सहभाग
उस्मानच्या अटकेनंतर चौकशीत तो व त्याचा मोठा भाऊ सोफियान सोबत हा धंदा करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी सोफियानच्याही मुसक्या आवळल्या. उस्मानवर यापूर्वी एक अमली पदार्थांचा गुन्हा असून ३० मार्च २०२३ रोजी किराडपुऱ्यात उसळलेल्या दंगलीत तो आरोपी होता. सध्या दोन्ही गुन्ह्यांत तो जामिनावर आहे.