उभ्या वाहनाला रिक्षाची धडक; बहिणीच्या हळदीला जाणाऱ्या भावाचा जागीच मृत्यू, चिमुकली जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 13:26 IST2026-04-30T13:26:03+5:302026-04-30T13:26:47+5:30
जालना-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; सटाणा येथील तरुणाचा जागीच अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

उभ्या वाहनाला रिक्षाची धडक; बहिणीच्या हळदीला जाणाऱ्या भावाचा जागीच मृत्यू, चिमुकली जखमी
शेकटा (ता. छत्रपती संभाजीनगर): मावस बहिणीच्या हळदीचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या सटाणा येथील एका कुटुंबावर वाटेतच काळाने झडप घातली. जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावरील तुलसी हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालक राजू जिजा जगधने (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची आठ वर्षांची मुलगी तनुजा ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
आनंदाच्या प्रवासात मृत्यूचे सावट
राजू जगधने हे आपल्या रिक्षातून कुटुंबासह कौडगाव येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी जात होते. तुलसी हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका वाहनावर त्यांची रिक्षा जोरात धडकली. ही धडक इतकी भीषण होती की राजू यांचा घटनास्थळीच प्राण गेला. जखमी तनुजाला तातडीने रुग्णवाहिकेने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुटुंबाचा एकमेव आधार हरवला
मयत राजू जगधने यांच्या पश्चात पत्नी, आई, चार मुली आणि अवघ्या सात महिन्यांचा मुलगा असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील एकमेव कमावता पुरुष गेल्याने जगधने कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून संपूर्ण सटाणा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.