CoronaVirus : कोरोनाग्रस्ताचे नातेवाईक जडगावमध्ये आले नाहीत; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 16:29 IST2020-04-30T16:28:41+5:302020-04-30T16:29:35+5:30

वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी अफवा आहे. कुणीही या अफवेवर विश्वास ठेवू नये असे जडगाव ग्रामपंचायततर्फे जाहीर करण्यात आले.

CoronaVirus: Relatives of Corona patient did not come to Jadgaon; Citizens should not believe rumors | CoronaVirus : कोरोनाग्रस्ताचे नातेवाईक जडगावमध्ये आले नाहीत; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

CoronaVirus : कोरोनाग्रस्ताचे नातेवाईक जडगावमध्ये आले नाहीत; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

ठळक मुद्देऔरंगाबाद येथील एका कोरोना बाधित रुग्णाचे घर जडगाव येथे आहे

करमाड : गुरुदत्त नगर येथील कोरोना पोजीटीव्ह वाहन चालकाचे वडिल तीन दिवसांपूर्वी जडगाव येथे आले अशी बातमी एका वर्तमानपत्राने ( लोकमतने नाही ) प्रकाशित केल्यानंतर करमाड परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान ग्रामपंचायत , पोलीस यांनी गावात चौकशी केल्यानंतर जडगाव येथे बाहेरून कुणीही आले नसल्याचे जाहीर केले व सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
 
औरंगाबाद येथील भावसिंगपुऱ्यातील कोरोनाग्रास्थ महिलेच्या अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या गारखेडा परिसरातील गुरुदत्तनगर येथील वाहन चालक हा कोरोना पॉझिटिव्ह निघाला त्यानंतर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कॉरंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, वाहन चालकाचे वडील हे सुद्धा त्याच्या सोबत गुरुदत्त नगर येथे राहत होते व ते तीन दिवसांपूर्वी त्यांच्या मूळगावी म्हणजे करमाड जवळील जडगाव येथे आले असल्याची बातमी एका दैनिकाने प्रकाशित केली. यानंतर करमाड परिसरात एकाच खळबळ उडाली. कारण त्याचे वडिल येथे आले असते तर तीन किलोमीटरचा परिसर सील करावा लागला असता. हे झाले असते तर हिवरा, टोणगाव, गारखेडा नं २, जडगाव नं २, लाडगाव, मंगरुळ आदी गाव देखील सील करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली असती. ही बातमी या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूच्या गावात प्रचंड दहशत निर्माण झाली.

त्यामुळे करमाड पोलीस ठाण्याचे सापोनी संतोष खेतमाळस व त्यांचे सहकारी, पं.स.सदस्य रामकीसन भोसले, सरपंच राजेंद्र भोसले, पोलीस पाटील नारायण भोसले, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी आदी तात्काळ जडगाव येथील कोरोना ग्रस्ताच्या घराजवळ दाखल झाले. येथे राहणाऱ्या संपूर्ण नागरिकांची चौकशी केली असता या ठिकाणी कोरोना ग्रस्त चालकाचे वडील आलेच नाही व ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध झाले व सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

या घटनेनंतर ग्रामपंचायत मार्फत पंचनामा करून एक लेखी परिपत्रक काढण्यात आले व सदर ठिकाणचा पंचनामा करून या ठिकाणी कुणीही आले नसून वर्तमानपत्रात छापून आलेली बातमी अफवा आहे. कुणीही या अफवेवर विश्वास ठेवू नये असे जाहीर करण्यात आले.

Web Title: CoronaVirus: Relatives of Corona patient did not come to Jadgaon; Citizens should not believe rumors