गोळीबारानंतर छ. संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; मुख्य आरोपी पवन दिवेकरसह ८ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:39 IST2026-04-18T13:38:34+5:302026-04-18T13:39:07+5:30
मिरवणुकीतील वादातून गँगवॉर : अटकेनंतर सर्वांचा ठाण्यात यथेच्छ ‘पाहुणचार’, संपूर्ण टोळीवर गंभीर कारवाईसाठी पोलिसांकडून तयारी सुरू

गोळीबारानंतर छ. संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडमध्ये; मुख्य आरोपी पवन दिवेकरसह ८ जण अटकेत
छत्रपती संभाजीनगर : हनुमानगरमधील गोळीबारानंतर पोलिसांच्या भीतीने शहरात लपण्यासाठी जागा शोधणाऱ्या पवन दिवेकर व नीलेश ऊर्फ सूर्या नारायण रांजणे (रा. न्यायनगर) यांच्यासह आठजणांच्या पहाटे ५ वाजेपर्यंत पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यात रांजणेनेही गोळीबार केल्याचा दावा विरोधी गटाने केला. पोलिसांनी मात्र याचा इन्कार केला. १४ एप्रिल रोजी मिरवणुकीतील छायाचित्र झळकल्यानंतर उफाळून आलेला वादच गोळीबारापर्यंत पोहोचल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.
काही दिवसांपासून लृटमार, प्राणघातक हल्ले, पिस्तुलाद्वारे दहशत माजवण्याच्या घटनांनी शहर हादरत आहे. एपीआय कॉर्नर परिसरात एका तरुणाला भाेसकून लुटण्यात आले. ७२ तासांत सातपेक्षा अधिक महिलांना लुटण्यात आले. त्याशिवाय, हर्सूलमध्ये एका गुन्हेगाराने पिस्तुलाने दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली. वाळूजमध्ये मुलीच्या गळ्याला चाकू लावून लूट झाली. त्यातच गुरुवारी हनुमाननगरमध्ये भर वसाहतीमध्ये गोळीबाराच्या घटनेने शहर पुन्हा थरारले.
जयंती मिरवणुकीतील वाद गोळीबारापर्यंत
१४ रोजी पुंडलिकनगरमध्येे मिरवणुकीत दिवेकरचे छायाचित्र झळकल्याने वाद झाला. त्यातून दिवेकरचा मामेभाऊ कुणाल साळवे (२६, रा. न्यायनगर) याला रांजणेच्या टोळीने झेंड्याच्या रॉडने मारले. दोन दिवस धुसफूस सुरू असताना दिवेकर, रांजणेने गुरुवारी एकमेकांवर चाकूने हल्ला केला. त्यात गोळी झाडली गेली.
पुंडलिकनगर पोलिसांनी कुणाल साळवेच्या तक्रारीवरून नीलेश रांजणे, आदित्य दाभाडे, आकाश साळुंखे, अमोल साळुंखे, ओंकार गिरीसह अन्य दोघांवर, तर रांजणेच्या तक्रारीवरून दिवेकर, कुणाल साळवे, रोहन दिवेकर, सिद्धार्थ चाबूकस्वार, सतीश हिवराळे यांच्यावर गुन्हे दाखल केले.
यांच्या आवळल्या मुसक्या
पवन दिवेकर, कुणाल साळवे, महेश गौतम साळवे (३०, रा. संसारनगर), रोहन दिवेकर (२४, रा.एमएसईबी कर्मचारी वसाहत, मिल कॉर्नर), सतीश हिवराळे (२३, समतानगर), सिद्धार्थ चाबूकस्वार (२१, रा. न्यायनगर, गारखेडा), रांजणे व आकाश साळुंखे (रा. हनुमाननगर).
पहाटे ५ वाजता चहा पिताना सापडला
गोळीबारानंतर दिवेकर पोलिसांना घाबरून शहरातील विविध भागांत लपण्यासाठी जागा शोधत होता. भावसिंगपुरा, पडेगाव, मिटमिट्यात त्याने लपण्याचा प्रयत्न केला. मोबाईल सुरू बंद करत होता. पहाटे ५ वाजता पोलिसांनी त्याचा एका साथीदार व मामेभावाला पकडले. त्यांच्याकडून पवन पैठण गेटला असल्याचे कळाले. फौजदार अर्जुन राऊत, सुनील म्हस्के, अंमलदार प्रकाश डोंगरे, संदीप बीडकर, अजय कांबळे यांनी धाव घेतली. पोलिसांना पाहताच दिवेकर पळत सुटला. पाठलागात पडून राऊत पाय मोडून जखमी झाले. तरीही पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. अटकेनंतर सर्वांचा ठाण्यात यथेच्छ ‘पाहुणचार’ झाला.