'भीमराया घे तुला या लेकरांची वंदना'; उन्हाची पर्वा न करता छ. संभाजीनगरात अभिवादनासाठी प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:10 IST2026-04-15T15:06:12+5:302026-04-15T15:10:02+5:30
दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष-संघटनाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.

'भीमराया घे तुला या लेकरांची वंदना'; उन्हाची पर्वा न करता छ. संभाजीनगरात अभिवादनासाठी प्रचंड गर्दी
छत्रपती संभाजीनगर : उन्हाची पर्वा न करता ही निळी पाखरे जणू ''भीमराया घे तुला या लेकरांची वंदना'' अशी आर्त साद घालत आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करत होती. भडकलगेट येथे मंगळवारी दिवसभर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी विविध पक्ष-संघटनाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
जगभरात १४ एप्रिल रोजी या महामानवाची जयंती उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती संभाजीनगर हे शहर तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी. जयंतीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण शहरात अनुयायांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. त्यानंतर मंगळवारी पहाटेपासूनच भडकलगेट येथील बाबासाहेबांच्या नियोजित स्मारकाकडे अभिवादनासाठी आबालवृद्धांची पावले वळली.
सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या अभिवादन सभेत महापौर समीर राजूरकर, मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, माजी खासदार डॉ. भागवत कराड, उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे, भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे, मनसेचे नेते दिलीप चितलांगे, सतनामसिंग गुलाटी, रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा समितीचे मुख्य सल्लागार बाबूराव कदम, कार्याध्यक्ष किशोर थोरात आदींनी शुभेच्छापर भाषणे केली. यावेळी मंचावर द्वारकाभाऊ पाथ्रीकर, पृथ्वीराज पवार, सुभाष पाटील, इब्राहिम पटेल, इकबालसिंग गिल, रशीद मामू, मिलिंद दाभाडे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष नवीनसिंग ओबेरॉय यांनी आभार मानले.
पुस्तकांचे मोफत वाटप
भडकलगेट येथे बोधी ट्री एज्युकेशन फाउंडेशन व माई वृद्धाश्रमाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तब्बल १० हजार पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात आले. राज्यभरातील अनेक लेखक, तसेच मान्यवरांनी पुस्तके देऊन या उपक्रमाला हातभार लावला. ज्ञानसूर्याच्या जयंतीदिनी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत याचा आम्हाला अभिमान असल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी दिली.