आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 06:03 IST2026-04-16T06:02:55+5:302026-04-16T06:03:39+5:30
Narendra Modi : पाणी संवर्धन, नैसर्गिक शेती, आरोग्य आणि सेवा यांसह नऊ सामूहिक प्रतिज्ञांचा स्वीकार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशातील नागरिकांना केले.

आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
मंड्या - पाणी संवर्धन, नैसर्गिक शेती, आरोग्य आणि सेवा यांसह नऊ सामूहिक प्रतिज्ञांचा स्वीकार करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशातील नागरिकांना केले.
या नऊ संकल्पांवर प्रामाणिकपणे काम केले, तर विकसित कर्नाटकसोबतच विकसित भारताचे स्वप्न साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्नाटकच्या मंड्या येथील आदिचुंचनगिरी महासंस्थान मठात ‘श्री गुरू भैरवैक्य मंदिरा’च्या उद्घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.
काेणत्या आहेत नऊ सेवा?
पाणी व्यवस्थापन व संवर्धन, ‘आईच्या नावाने एक झाड’ अंतर्गत वृक्षारोपण, सार्वजनिक व धार्मिक स्थळांची स्वच्छता, ‘वोकल फॉर लोकल’द्वारे स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन, देशांतर्गत पर्यटन, रसायनमुक्त नैसर्गिक शेती, भरड धान्यांचा (मिलेट्स) आहारात वापर व तेलाचे प्रमाण कमी करणे, योग-फिटनेस आणि सेवाभाव या नऊ संकल्पांचा उल्लेख त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना केला.
कालभैरवेश्वर स्वामी मंदिरात मोदींनी केली पूजा
पंतप्रधान मोदींनी या उद्घाटनापूर्वी ज्वाला पीठ व श्री कालभैरवेश्वर स्वामी मंदिरात पूजा केली.
या संस्थेने समाजाला केवळ धार्मिक मार्गदर्शनच नाही, तर शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही मोठे योगदान दिले असल्याचे आदिचुंचनगिरी मठाच्या आध्यात्मिक परंपरेचे कौतुक करताना मोदी यांनी नमूद केले.