पोलिसांची गचांडी धरणारा कुख्यात गुन्हेगार जेरबंद; कोठडीत जाताच हात जोडून मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 19:39 IST2026-04-22T19:38:43+5:302026-04-22T19:39:00+5:30
कुख्यात गुन्हेगाराची वाहतूक पोलिसांना मारहाण; 'तेरे को देख लूँगा' म्हणणाऱ्याच्या रात्रीतून आवळल्या मुसक्या

पोलिसांची गचांडी धरणारा कुख्यात गुन्हेगार जेरबंद; कोठडीत जाताच हात जोडून मागितली माफी
छत्रपती संभाजीनगर : बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्याला थांबण्याचा इशारा करताच त्याने वाहतूक पोलिसांना मारहाण केली. शिवीगाळ करून ‘तेरे को देख लूँगा’, असे म्हणत धमकावले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी रात्रीतून अरबाज अहमद शेख (२५, रा. बायजीपुरा) याच्या मुसक्या आवळल्या. मात्र, गेल्या ४८ तासांत वाहतूक पाेलिसांवरील हल्ल्याची ही दुसरी घटना असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
वाहतूक शाखेचे चेतन किशोर गारदे हे सोमवारी रात्री अमरप्रीत चौकात कामावर होते. ८ वाजेच्या सुमारास मोंढा नाक्यावर वाहतूक कोंडी झाली. ती सोडवण्यासाठी गारदे तेथे गेले. तेव्हा बेजबाबदारपणे गाडी चालवणाऱ्या अरबाजला पोलिसांनी पकडले होते. अरबाज पोलिसांना मोठमोठ्याने शिवीगाळ करत होता. गारदे यांनी त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करताच त्याने त्यांची गचांडी धरली. अन्य अंमलदारांना मारहाण केली. शिवाय जिवे मारण्याची धमकी देऊन पळून गेला.
वरिष्ठांनी घेतली गंभीर दखल
अरबाजने मोठमोठ्याने पोलिसांना धमकावत हल्ला चढवला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्याच्या अटकेचे आदेश दिले. रात्रीतून अरबाजच्या मुसक्या आवळून कोठडीत टाकण्यात आले. रात्री पोलिसांना धमकावणारा अरबाज कोठडीत जाताच हात जोडून माफी मागत होता. त्याच्यावर यापूर्वी हल्ला, प्राणघातक हल्ल्याचे चार गुन्हे चिकलठाणा, सिडको, जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी सांगितले. फौजदार उपेंद्र कुतूर अधिक तपास करत आहेत.