ग्रंथप्रेमी महामानवाला विचारांची आदरांजली; छ. संभाजीनगरात १४ हजारांहून अधिक पुस्तकांचे वाटप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 15:50 IST2026-04-15T15:50:24+5:302026-04-15T15:50:24+5:30
एकूणच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती केवळ उत्सवी न राहता, समाजाला बौद्धिक ऊर्जा देणारी आणि वाचन संस्कृती रुजविणारी ठरली.

ग्रंथप्रेमी महामानवाला विचारांची आदरांजली; छ. संभाजीनगरात १४ हजारांहून अधिक पुस्तकांचे वाटप
छत्रपती संभाजीनगर : जगात कुणी आपल्या प्रिय व्यक्तीसाठी ताजमहाल बांधला, तर कुणी राजवाडे आणि मंदिरे उभारली. मात्र, पुस्तकांसाठी स्वतःचे ‘राजगृह’ बांधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव महामानव होते. याच ग्रंथप्रेमी महामानवाची जयंती मंगळवारी शहरात एका अनोख्या साहित्यिक उत्सवाने साजरी करण्यात आली. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी शहरात विविध संस्थांच्या माध्यमातून भव्य पुस्तक संकलन आणि वितरण अभियान राबविण्यात आले.
जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय आणि माई वृद्धाश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने भडकल गेट येथे सकाळी पुस्तक वितरण अभियानाला सुरुवात झाली. या उपक्रमाला नागरिकांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की, दुपारी १ वाजेपर्यंतच ५ ते ६ हजार पुस्तके हातोहात वितरित झाली. अभिवादनासाठी येणारे तरुण, वृद्ध, महिला आणि लहान मुले आपसूकच या स्टॉलकडे आकर्षित होत होते. पोलिस आयुक्त, महापौर, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक यांसह अनेक मान्यवरांनी उपक्रमाला भेट दिली. रामदास वाघमारे, मीरा वाघमारे, गौरव वाघमारे, प्रणाली वाघमारे, नीलेश उघडे आणि ज्ञानेश्वर हावळे यांनी संयोजन केले.
संविधान, चरित्राला मागणी
महोत्सवात प्रत्येक वयोगटासाठी पुस्तके होती. एमपीएससी आणि यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तके होती. 'संविधान', डॉ. बाबासाहेबांचे जीवनचरित्र, माता रमाई आणि 'लढाई नामांतराची' या पुस्तकांना मोठी मागणी होती. संविधानाच्या प्रती तर पहिल्या एका तासातच संपल्या. या ज्ञान यज्ञाला अनेकांनी पुस्तक दानातून बळ दिले. प्राचार्य ग. ह. राठोड यांनी १५० पुस्तके दिली. बाबा भांड यांनी १३ हजार रुपये किमतीची पुस्तके दिली. दिवंगत प्रा. रुस्तुम अचलखांब यांच्या सुमारे ४०० स्वहस्तलिखित पुस्तकांचा अनमोल ठेवा त्यांचे पुत्र राहुल आणि कन्या वर्षा अचलखांब यांनी दान केला.
महानायक फाउंडेशनचा पुढाकार
दुसरीकडे, महानायक सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे मानसशास्त्रज्ञ प्रा. सागर चाबूकस्वार यांनी आयोजित केलेल्या ‘बुक डोनेशन ड्राइव्ह’लाही मोठे यश मिळाले. यातून ४,५०० पुस्तके जमा झाली. यातील शालेय पुस्तके शहरातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शाळेत वाटली जातील. लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी जमा झालेल्या कथा आणि कादंबऱ्या दर रविवारी शहरातील विविध भागांतील समाज मंदिरात वाचनासाठी ठेवल्या जातील. एकूणच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती केवळ उत्सवी न राहता, समाजाला बौद्धिक ऊर्जा देणारी आणि वाचन संस्कृती रुजविणारी ठरली.