कारागृहातील मैत्रीचा क्रूर अंत; इंस्टाग्रामवर ज्यांचे स्टेटस ठेवले, त्यांनीच केला गुन्हेगाराचा घात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:46 IST2026-04-23T18:45:14+5:302026-04-23T18:46:27+5:30
मृतावर आठ गंभीर गुन्हे; मुख्य हल्लेखोरही २०२१ मधील बनावट नोटांच्या रॅकेटचा मास्टरमाइंड

कारागृहातील मैत्रीचा क्रूर अंत; इंस्टाग्रामवर ज्यांचे स्टेटस ठेवले, त्यांनीच केला गुन्हेगाराचा घात
छत्रपती संभाजीनगर : कारागृहातील ओळखीनंतर ज्यांना मित्र मानले, ज्यांच्या सोबत पार्टी केल्यानंतर छायाचित्र काढून इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवले, त्यांनीच गुन्हेगार रोहित ऊर्फ करण रवी मस्के (२५, रा. राजनगर) याचा केवळ जुन्या वादाचा खोचकपणे उल्लेख केल्याने घात केला. विशेष म्हणजे, यातील मृतासह मारेकरीदेखील पुंडलिकनगर, मुकुंदवाडीत फोफावलेल्या गुन्हेगारीच्या टोळ्यांचे सदस्य आहेत. मृत रोहितवर तब्बल ८ गंभीर स्वरूपाचे, तर इतरांवर हत्येचा प्रयत्न, दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या दहा वर्षांमध्ये स्थानिक पोलिसांच्या गुन्हेगारांसोबतची ऊठबस व निष्क्रियतेमुळे पुंडलिकनगर, मुकुंदवाडीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली. अनेक युवक गुन्हेगारीकडे वळले. सोशल मीडियावर राजरोस शस्त्र, गुन्ह्यांचे उदात्तीकरण सुरू झाले. नशेखोरी वाढली. आठ दिवसांपूर्वी पुंडलिकनगरमध्ये कुख्यात गुन्हेगार पवन दिवेकर, नीलेश रांजणेच्या टोळ्यांमध्ये गोळीबार झाला. त्याच परिसरात पुन्हा गुन्हेगारांच्या पार्ट्या अन् हत्येमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मंगळवारी रात्री या सर्व गुन्हेगारांनी पार्टी करण्याचे ठरवले होते. साईनगरमध्ये पार्टी झाल्यानंतर हे शिवाजीनगरमधील एका मैदानात बसले आणि तेथे ही घटना घडली.
२०२३ मधील हल्ला, खंडणीनंतर आला चर्चेत
-मार्च २०२३ मध्ये कुख्यात गुन्हेगार मुकेश साळवे, विकी ऊर्फ हेल्मेट सोनकांबळे, मुकेश ऊर्फ मुक्या साळवे, बालाजी पिवळ या टोळीने खंडणी मागून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यात रोहितसह ‘मकोका’अंतर्गत सर्वांना अटक झाल्यानंतर २०२५ ऑगस्टनंतर सर्व जामिनावर सुटले.
-८ मार्च २०२६ रोजी सिडको बसस्थानकापर्यंत सोडण्याची विनंती करणाऱ्या महिलेला लिफ्ट देणाऱ्या तरुणाला लुटण्यात आले होते. यातही रूपाली पाटील नामक महिलेसोबत रोहितला अटक झाली होती.
-त्याच्यावर मुकुंदवाडी ठाण्यात २०२३ मध्ये प्राणघातक हल्ला, मारहाण, २०२२ मध्ये मृत्यूस जबाबदार, २०२४ मध्ये बेकायदेशीर शस्त्रसाठा, मारहाण, २०२५ मध्ये जबरी चोरी, दरोडा असे ८ गुन्हे आहेत.
पडूळ बनावट नोटांचा मास्टरमाइंड
डिसेंबर २०२१ मध्ये पुंडलिकनगर पोलिसांनीच बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यात अक्षय अण्णासाहेब पडूळ (३०, रा. गजानननगर) हा त्या रॅकेटचा एक मास्टरमाइंड होता. त्यात त्याला अटक झाली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला.
अन्य हल्लेखोर कुख्यात गुन्हेगार
शेख बादशाह शेख बाबावर पुंडलिकनगरमध्ये २०२५ मध्ये दरोडा, लुटमार, २०२४ मध्ये हत्येचा प्रयत्न, २०२२ मध्ये बेकायदेशीर शस्त्रसाठा व हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाणीचे ४ गुन्हे दाखल.
प्रफुल्ल पाखरेवर पुंडलिकनगरमध्येच २०२५ मध्ये हत्येचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, मारहाणीचे ३ गुन्हे दाखल.
कृष्णा उदावंतवर पुंडलिकनगरमध्ये २०२६ मध्ये मारहाण, हत्येचा प्रयत्न, २०२४ मध्ये लुटमारीसह तीन गुन्हे दाखल.