सलग दोन दिवस एकच प्रकार! शिवाजी नगर भुयारी मार्गात हायवा अडकल्याने वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:48 IST2026-04-18T12:48:03+5:302026-04-18T12:48:48+5:30
शिवाजी नगर भुयारी मार्गात सलग दुसऱ्या दिवशी हायवा अडकला; तासाभर वाहतूक ठप्प, नागरिक संतापले.

सलग दोन दिवस एकच प्रकार! शिवाजी नगर भुयारी मार्गात हायवा अडकल्याने वाहतूक कोंडी
छत्रपती संभाजीनगर: शहरातील सातारा-देवळाई परिसराला जोडणाऱ्या छत्रपती शिवाजी नगर भुयारी मार्गात शुक्रवारी रात्री १०:१० च्या सुमारास पुन्हा एकदा हायवा अडकल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, गुरुवारी सकाळीही अशाच प्रकारे एक जड वाहन अडकले होते. सलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे भुयारी मार्गाच्या उंचीबाबत आणि अवजड वाहनांच्या प्रवेशाबाबत प्रशासकीय नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
वाहतूक कोंडीचा विळखा
शिवाजी नगरकडून देवळाई चौकाकडे जात असताना हा विना नंबर प्लेट असलेला हायवा बोगद्याच्या मध्यभागी अडकला. हायवा अडकल्याचे समजताच मागून येणाऱ्या वाहनचालकांनी वाहने मागे घेतली, मात्र काहींनी हायवा निघाल्याचा समजापोटी रिक्षा आणि चारचाकी आत घातल्या. यामुळे बोगद्यात दोन्ही बाजूने वाहने अडकून पडल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली.
टायरची हवा सोडली अन् रस्ता मोकळा झाला
हायवा बाहेर निघणे अशक्य झाल्याने शेवटी चालकाने समोरील टायरमधील हवा सोडली. उंची थोडी कमी झाल्याने सुमारे अर्ध्या तासानंतर (रात्री १०:३० वाजता) हा हायवा बोगद्याबाहेर निघाला. सलग दोन दिवस अशा घटना घडत असल्याने, "हा भुयारी मार्ग नागरिकांच्या सोयीसाठी आहे की अडचणीसाठी?" असा संतप्त सवाल स्थानिक रहिवाशांकडून विचारला जात आहे.