क्रूर नियती! पावसापासून धान्य वाचविण्यास ताडपत्री घेऊन निघालेल्या शेतकऱ्याचा रस्त्यातच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:11 IST2026-04-18T12:09:15+5:302026-04-18T12:11:19+5:30
कडा परिसरात हळहळ! डोंगरगण जवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला समोरासमोर धडक; शेतकरी बाबासाहेब शिंदेंचा मृत्यू.

क्रूर नियती! पावसापासून धान्य वाचविण्यास ताडपत्री घेऊन निघालेल्या शेतकऱ्याचा रस्त्यातच मृत्यू
कडा (बीड): पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतातील माल झाकून ठेवण्यासाठी कड्यावरून ताडपत्री घेऊन गावाकडे निघालेल्या एका शेतकऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री कडा-देवळाली रोडवरील डोंगरगण शिवारात घडली. बाबासाहेब जनार्धन शिंदे (५०, रा. दादेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
वाटेतच काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील बाबासाहेब शिंदे शुक्रवारी सायंकाळी आपली दुचाकी (क्रमांक MH 04, GV 5384) घेऊन कडा येथील बाजारपेठेत आले होते. किराणा आणि शेतीमाल पावसापासून वाचवण्यासाठी ताडपत्री खरेदी करून ते गावी परतत होते. डोंगरगण जवळ पोहोचले असता, समोरून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
परिवारावर दुःखाचा डोंगर
धडक इतकी भीषण होती की बाबासाहेब शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह फरार झाला. कडा प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शिंदे यांच्या निधनाने दादेगाव परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.