५५० कोटी खर्च करूनही पाणीटंचाई कायम; चार वर्षांत एकही योजना नाही गेली पूर्णत्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 19:20 IST2026-05-08T19:06:10+5:302026-05-08T19:20:08+5:30
Amravati : 'हर घर जल' देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या जलजीवन मिशन योजनेला जिल्ह्यात प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या देखरेखीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ६२५ गावांसाठी ८५० कोटींच्या २५ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या.

Water shortage persists despite spending Rs 550 crore; Not a single project has been completed in four years
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : 'हर घर जल' देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या जलजीवन मिशन योजनेला जिल्ह्यात प्रशासकीय अनास्थेचे ग्रहण लागले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या देखरेखीत जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ६२५ गावांसाठी ८५० कोटींच्या २५ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्या. मात्र, चार वर्षात ५५० कोटी रुपये खर्च होऊनही एकही योजना पूर्णत्वास गेले नाही. परिणामी, ऐन उन्हाळ्यात ५२० गावांतील ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.
४ वर्षे उलटली, कामे अपूर्ण
अचलपूर, धारणी, चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूर बाजार, मोर्शी, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, भातकुली आणि अमरावती या ११ तालुक्यांमध्ये २०२१-२२ मध्ये या योजनांचे कार्यारंभआदेश देण्यात आले होते. मात्र, २०२६ मध्येही कुठे पाईपलाईन टाकली तर टाकी नाही, तर कुठे केवळ खोदकाम करून कामे अर्धवट सोडून देण्यात आल्याची वस्तुस्थिती आहे.
मेळघाटात १०५ गावांचा पाण्यासाठी संघर्ष
सर्वात वाईट स्थिती मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांत आहे. येथील १०५ गावांमध्ये आदिवासी बांधवांना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे.
९ गावांची तहान टँकवर
चिखलदरा तालुक्यातील मोथा, लवादा, खडीमल, गौलखेडा बाजार, बहाद्दरपूर, आकी, महेरीयम, आलाडोह, गवळी ढाणा या गावांतील सहा हजारावर ग्रामस्थांना टैंकरने पाणी पुरविले जात आहे.
पैसा गेला कुठे? ५५० कोटींचा हिशेब द्या
आतापर्यंत ८५० कोटींपैकी ५५० कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, जमिनीवर एकही योजना १०० टक्के पूर्ण झालेली दिसत नाही. अर्धवट बांधकामे आणि रखडलेली कामे पाहून हा निधी नेमका कुठे खर्च झाला? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
"मजीप्राकडून जलजीवन मिशनअंतर्गत ६२५ गावांसाठी पाणीपुरवठा योजनेची कामे केली जात आहेत. कंत्राटदारांची २६ कोटींची देयके प्रलंबित असल्याने योजनेची कामे संथगतीने सुरू आहेत. आगामी कालावधीत योजना पूर्ण करण्यात येईल."
- सुनील चव्हाण, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अमरावती.