Rajendra Gadge : संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदू राजेंद्र बापू गडगे याच्या आश्रमातून दोनशेहून अधिक व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यात दिसणाऱ्या लोकांची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. तसेच पोलिस कोठडीत असलेला भोंदू गडगे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर संगमनेर, अहिल्यानगर, नेवासा, राहता येथे १३ मालमत्ता असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे, असे श्रीरामपूर विभागाचे अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी सांगितले.
कॅन्सरसारखे दुर्धर आजार मंत्राने, दैवी शक्तीने बरे करतो, मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो, घरातील सर्व समस्या मंत्रशक्तीद्वारे बऱ्या करतो, असे सांगून अनेकांची अंधश्रद्धेद्वारे फसवणूक करत गडगे हा त्यांच्याकडून पैसे उकळायचा. त्याच्यासह डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे आणि सूरज शिंदे, मधुकर शिंदे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव अॅड. रंजना पगार गवांदे यांनी फिर्याद दिली आहे. गडगे आणि मधुकर शिंदे हे दोघे अटकेत आहेत.
यासंदर्भात संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या संदर्भाने अपर पोलिस अधीक्षक वाघचौरे यांनी शुक्रवारी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यांच्यासमवेत तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे होते. पत्रकारांना माहिती देताना वाघचौरे म्हणाले, आश्रमातून हस्तगत केलेले सर्व व्हिडिओ फॉरेन्सिक टीमकडून ऑडिट करून घेणार आहोत. गडगे याची ट्रस्ट नोंदणीकृत असून त्यावर सात ट्रस्टी आहेत. विविध बँकांमध्ये दहा ठिकाणी गडगे याची खाती असून त्यावर झालेल्या आर्थिक व्यवहाराचे संदर्भाने देखील पोलिस अधिक तपास करत आहेत.
त्यातूनही माहिती समोर येईल
गडगे याच्या उपचाराने बरे वाटत आहे, असे सांगणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. उपचाराने बरे वाटते, असे सांगणारे लोक हे खरोखर रुग्ण आहेत का? अथवा त्यांचे गडगे याच्याशी काय संबंध आहेत?, याचाही तपास पोलिस करणार आहे. त्यातूनही अधिक माहिती समोर येईल. गडगे महाराज याच्या भोंदूगिरी प्रकरणात डॉ. मोहन पुरी हा आरोपींपैकी एक आहे. तो पसार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. डॉ. पुरी हा औषध पुरवठ्याचा सूत्रधार आहे. त्याच्यावर नाशिक जिल्ह्यात चार गुन्हे दाखल आहेत, असेही वाघचौरे यांनी सांगितले.
"गडगे याच्या आश्रमात मेडिकल रूम वापरल्या जात होत्या, त्या ठिकाणाहून नव्वदच्या पुढे सॅम्पल ताब्यात घेतले आहेत. त्यातील काही सॅम्पल अन्न व औषध प्रशासनाकडे पाठविले आहेत. बाबाचे अन्य काही साथीदार, सहकारी आहेत का?, त्याचबरोबरच गडगे याच्याकडून लोकांना साहित्य, तत्सम औषधे पुरविली जात होती. या सर्व बाबींचा तपास पोलिस करत आहेत. डॉ. मोहन पुरी याने गडगे याच्यासह इतर अजून कुणाला औषधी पुरविली असण्याची दाट शक्यता आहे," अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.
Web Summary : Rajendra Gadge, a fraudulent guru, faces investigation after videos and drug samples were found in his ashram. Police discovered 13 properties linked to Gadge and his family. Investigations are underway to determine the connection between Gadge and those who claim to have benefited from his treatments.
Web Summary : राजेंद्र गडगे नामक एक फर्जी गुरु के आश्रम में वीडियो और दवाओं के नमूने मिलने के बाद जांच शुरू हो गई है। पुलिस ने गडगे और उसके परिवार से जुड़ी 13 संपत्तियां बरामद की हैं। गडगे और उसके उपचार से लाभान्वित होने का दावा करने वालों के बीच संबंध का पता लगाने के लिए जांच जारी है।