Paytm License Cancel: तुम्हीही सकाळच्या चहापासून किराणा मालापर्यंत सर्व गोष्टींसाठी पेटीएमचा (Paytm) वापर करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँकेनं (RBI) पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडचा (PPBL) बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर गेल्या काही तासांत निर्माण झालेल्या गोंधळावर कंपनीनं आपलं मौन सोडलं आहे. ग्राहकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, परंतु कंपनीनं स्पष्ट केलंय आहे की घाबरण्याचं कोणतंही कारण नाही.
रिझर्व्ह बँकेनं २४ एप्रिल २०२६ रोजी व्यवसाय बंद होण्याच्या वेळेपासून 'पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेड'चा बँकिंग परवाना रद्द केला आहे. या बातमीनंतर पेटीएमची मूळ कंपनी 'वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेड'नं निवेदन जारी करून लाखो ग्राहकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत.
तुमचं पेटीएम ॲप सुरू राहणार का?
वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत स्पष्ट केलंय की, रिझर्व्ह बँकेच्या या कडक पावलाचा परिणाम त्यांच्या मुख्य ॲपवर होणार नाही. जर तुम्ही Paytm QR, साउंडबॉक्स किंवा कार्ड मशीन वापरणारे दुकानदार असाल, तर तुम्ही निर्धास्तपणे तुमचं काम सुरू ठेवू शकता. पेटीएम ॲप, पेटीएम UPI आणि पेमेंट गेटवे यांसारख्या सर्व प्रमुख सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहतील, असं आश्वासन कंपनीनं दिलंय.
पेटीएम बँक बंद, पण इतर सेवा सुरक्षित
रिझर्व्ह बँकेनं नियमांच्या उल्लंघनामुळे २४ एप्रिल २०२६ रोजी Paytm Payments Bank (PPBL) चा परवाना रद्द केला आहे. मात्र, लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे पेटीएम ॲप आणि पेटीएम पेमेंट्स बँक या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कंपनीने खालील बाबी स्पष्ट केल्या आहेत:
Paytm Money आणि Paytm Gold: गुंतवणुकीशी संबंधित या दोन्ही सेवा पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि सामान्यपणे सुरू राहतील.
थेट संबंध नाही: कंपनीनं सांगितलं की, मार्च २०२४ पासून त्यांचा पीपीबीएल (PPBL) सोबत कोणताही व्यावसायिक ताळमेळ किंवा भागीदारी नाही. पेटीएम बँक पूर्णपणे स्वतंत्रपणे काम करत होती आणि त्यात कंपनीच्या बोर्डाचा कोणताही हस्तक्षेप नव्हता.
आर्थिक परिणाम: कंपनीच्या मते, या कारवाईचा त्यांच्या मुख्य व्यवसायावर कोणताही थेट आर्थिक परिणाम होणार नाही, कारण त्यांनी आधीच बँकेतील आपल्या गुंतवणुकीचं मूल्य अकाऊंट बुक्समध्ये समायोजित केले आहे.
ग्राहकांनी पुढे काय करावं?
पेटीएमने आपले स्टेकहोल्डर्स आणि कोट्यवधी ग्राहकांना आश्वस्त केलंय की, आरबीआयची ही कारवाई केवळ सहयोगी बँकेपुरती (PPBL) मर्यादित आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या 'वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेड'शी याचा कोणताही संबंध नाही. याचा अर्थ असा की, जर तुम्ही पेटीएमद्वारे रिचार्ज, बिल पेमेंट किंवा इतर यूपीआई (UPI) व्यवहार करत असाल, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही.
पेटीएमचा परवाना का रद्द झाला?
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पेमेंट्स बँकेच्या नियमांचं पालन न केल्यामुळे पेटीएम पेमेंट्स बँकचा बँकिंग परवाना रद्द केला. आरबीआयनं म्हटलं की, बँकेचं कामकाज अशा पद्धतीनं चालवलं जात होतं जे तिच्या ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक होतं. बँक बंद करण्यासाठी आरबीआय उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. बँकेनं पेमेंट्स बँक परवान्याच्या अटींचं पालन केलं नाही, म्हणूनच ही कारवाई करण्यात आल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलं.
Web Summary : RBI cancelled Paytm Payments Bank's license, but Paytm app, UPI, and payment gateways remain operational. Investments like Paytm Money and Gold are secure. The company assures users that daily transactions are unaffected by this action.
Web Summary : RBI ने Paytm पेमेंट्स बैंक का लाइसेंस रद्द कर दिया, लेकिन Paytm ऐप, UPI और पेमेंट गेटवे चालू रहेंगे। Paytm मनी और गोल्ड जैसे निवेश सुरक्षित हैं। कंपनी उपयोगकर्ताओं को आश्वस्त करती है कि दैनिक लेनदेन इस कार्रवाई से अप्रभावित हैं।