देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्या आयटी (IT) क्षेत्रातील अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि त्यानंतर ऑटोमेशन व आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (AI) नोकरभरतीवर मोठा परिणाम झाला आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक, विप्रो आणि टेक महिंद्रा यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी नवीन भरती थांबवली आहे. इतकंच नाही तर या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांची संख्याही हजारोंनी कमी केली आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जिथे १२,७१८ कर्मचाऱ्यांची वाढ झाली होती, तिथे गेल्या आर्थिक वर्षात ७,३८९ कर्मचारी कमी झाले आहेत.
गेल्या आर्थिक वर्षात 'टीसीएस'नं (TCS) सर्वात मोठा धक्का दिला असून एकाच वेळी १२,००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. कोणत्याही भारतीय कॉर्पोरेट कंपनीकडून अलिकडच्या काळातील ही सर्वात मोठी कर्मचारी कपात आहे. टीसीएसच्या या निर्णयामुळे संपूर्ण आयटी क्षेत्रावर परिणाम झाला असून, इतर काही कंपन्यांनी भरती करूनही एकूण कर्मचारी संख्येत घटच दिसून येत आहे. भारतातील टॉप ५ आयटी कंपन्यांपैकी ३ कंपन्यांनी भरती केली होती, परंतु टीसीएसच्या कपातीमुळे एकूण आकडेवारी खालावली आहे.
अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
कोणत्या कंपनीत भरती आणि कोणाकडे कपात?
आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात इन्फोसिसमधील कर्मचाऱ्यांची संख्या ८,४४० नं कमी झाली आहे. टीसीएसनं मोठ्या कपातीनंतर २,३५६ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. एचसीएल टेकनं ८०२ आणि विप्रोनं १३५ नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. दुसरीकडे, टेक महिंद्रानेही कर्मचारी कपातीचे धोरण अवलंबले आणि १,९९३ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं.
नासकॉमचा अहवाल काय सांगतो?
आयटी क्षेत्रातील संघटना 'नासकॉम'च्या वार्षिक अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात आयटी क्षेत्रात केवळ २,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती झाली. या काळात देशातील एकूण टेक क्षेत्रात १.३५ लाख कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली, जी मागील वर्षाच्या १.३३ लाखांच्या तुलनेत किंचित जास्त आहे. संपूर्ण उद्योगाचा विचार करता, गेल्या आर्थिक वर्षापर्यंत आयटी क्षेत्रात एकूण ५९.५ लाख कर्मचारी कार्यरत आहेत, जे मागील वर्षाच्या तुलनेत २.३ टक्क्यांनी जास्त आहेत.
चालू वर्ष ठरणार सुखद
गेल्या आर्थिक वर्षात नोकरभरतीवर संकटाचे सावट असलं तरी, चालू वर्ष भरतीसाठी चांगले राहण्याची शक्यता आहे. विशेषतः फ्रेशर्सच्या भरतीबाबत कंपन्या उत्साही आहेत.
टीसीएस : चालू आर्थिक वर्षात सुमारे २५,००० फ्रेशर्सची भरती करणार असल्याचे जाहीर केलं आहे (जरी हा आकडा मागील दोन वर्षांतील ४२,००० च्या तुलनेत कमी आहे).
इन्फोसिस : चालू वर्षात २०,००० फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे.
इतर कंपन्या : एचसीएल टेक, टेक महिंद्रा आणि विप्रो यांनीही फ्रेशर्सना संधी देण्याचं ठरवलं आहे. नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, गेल्या वर्षी एचसीएल टेकनं ११,७४४ आणि विप्रो ने ७,५०० लोकांची भरती केली होती.
Web Summary : IT sector faces hiring slowdown; TCS, Infosys, HCLTech, Wipro, Tech Mahindra reduce workforce. 7,389 employees were laid off last fiscal year. Freshers' hiring is expected to rise this year.
Web Summary : आईटी क्षेत्र में भर्ती धीमी; टीसीएस, इंफोसिस, एचसीएलटेक, विप्रो, टेक महिंद्रा ने कर्मचारियों की संख्या घटाई। पिछले वित्त वर्ष में 7,389 कर्मचारियों को निकाला गया। इस साल फ्रेशर्स की भर्ती बढ़ने की उम्मीद है।