Join us
Daily Top 2Weekly Top 5

Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 11:45 IST

Panama Canal Charge: अमेरिका आणि इराणमधील तणाव कायम असून कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा प्रति बॅरल १०५ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे, होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेनं केलेली नाकेबंदी आणि इराणचं वर्चस्व यामुळे तेल-वायू संकट गडद होताना दिसत आहे.

Panama Canal Charge: अमेरिका आणि इराणमधील तणाव कायम असून कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा एकदा प्रति बॅरल १०५ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. दुसरीकडे, होर्मुझ सामुद्रधुनीवर (Hormuz Strait) अमेरिकेनं केलेली नाकेबंदी आणि इराणचं वर्चस्व यामुळे तेल-वायू संकट गडद होताना दिसत आहे. मात्र, या जागतिक तणावादरम्यान एका छोट्या देशाची मोठी कमाई सुरू आहे. तो देश म्हणजे पनामा. जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पनामा कालवा (Panama Canal) सध्या जगातील सर्वात महागडा सागरी मार्ग ठरत आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे तेल आणि गॅस वाहून नेणारी जहाजं आता पनामा कालव्याचा मार्ग निवडत आहेत. या मार्गावरून जाण्यासाठी जहाजांमध्ये इतकी स्पर्धा लागली आहे की, आता लिलाव प्रक्रिया राबवावी लागत आहे. एका टँकरला येथून जाण्यासाठी सुमारे ४ मिलियन डॉलर (३७ कोटी रुपयांहून अधिक) खर्च करावा लागत आहे.

Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?

पनामा कालव्यावरून जाण्यासाठी जहाजांची चढाओढ

रिपोर्टनुसार, जगातील एकूण तेल वापरापैकी सुमारे २० टक्के पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. अमेरिका-इराण युद्धामुळे हा मार्ग सध्या बंद आहे. दोन्ही देशांमधील तणाव पाहता हा मार्ग लवकर उघडण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शिपिंग कंपन्या पर्यायी मार्गांचा शोध घेत आहेत आणि त्यात पनामा कालवा हा सर्वात महत्त्वाचा मार्ग ठरला आहे. यामुळे अचानक या कालव्यावर जहाजांची वर्दळ प्रचंड वाढली आहे.

लिलाव प्रक्रिया आणि प्रचंड खर्च

पनामा कालव्यावर सध्या जहाजांची प्रतीक्षा यादी खूप वाढली आहे. शेवटच्या क्षणी जागा मिळवण्यासाठी कालवा प्राधिकरण लिलाव पद्धतीचा वापर करत आहे, ज्यामध्ये सर्वाधिक बोली लावणाऱ्या जहाजाला प्राधान्य दिलं जातं. सामान्यतः या कालव्यावरून जाण्यासाठी आरक्षणानुसार एक ठराविक शुल्क असतं, परंतु ज्या कंपन्यांकडे बुकिंग नाही, त्या लिलावाद्वारे जास्त पैसे देऊन मार्ग पार करत आहेत.

खर्चाचं गणित 

पनामा कालव्यातून जाण्यासाठी सामान्यतः ३ ते ४ लाख डॉलर खर्च येतो. पूर्वी फास्ट-ट्रॅकसाठी अतिरिक्त २.५ ते ३ लाख डॉलर द्यावे लागत होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत ही अतिरिक्त बोली ४.२५ मिलियन डॉलर किंवा त्यापेक्षाही जास्त झाली आहे. ही रक्कम नियमित टोल शुल्कापेक्षा वेगळी आहे.

जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम

पनामा कालवा प्राधिकरणाच्या मते, इराण युद्धामुळे जागतिक व्यापार प्रवाहात मोठा बदल झाला आहे. होर्मुझ सामुद्रधुनी टाळण्यासाठी व्यापारी जहाजं आता वेगानं पनामा कालव्याचा वापर करत आहेत. विश्लेषक रॉड्रिगो नोरिएगा यांच्या मते, बॉम्बफेक, क्षेपणास्त्रं आणि ड्रोन हल्ल्यांच्या भीतीमुळे शिपिंग कंपन्यांना पनामा कालव्याचा मार्ग अधिक सुरक्षित वाटत आहे. मात्र, या वाढीव खर्चामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम होत आहे. पनामा सरकार या संधीचा फायदा घेत या कालव्याद्वारे जास्तीत जास्त कमाई करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Panama Canal profits surge amidst US-Iran tensions, charging $44 million per ship.

Web Summary : US-Iran tensions force ships to Panama Canal, raising charges to $4.25 million, impacting global supply chains as Panama profits from increased traffic due to Hormuz Strait closure.
टॅग्स :अमेरिका-इस्रायल-इराण वॉरखनिज तेल