होर्मुझ सामुद्रधुनी (Hormuz Strait) जवळपास बंद झाल्यामुळे आशियातील अनेक देश संकटात सापडले आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले असून जीवनरक्षक औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे, तर कारखान्यांना पॅकेजिंग मटेरियल मिळेनासे झालेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सध्या इराणची नाकेबंदी संपवण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि इराणनं होर्मुझ मार्ग खुला करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. याचा मोठा फटका आशियाई देशांना बसत असून लवकरच अमेरिकाही याच्या कचाट्यात येऊ शकतो. कारण, अमेरिकन नागरिक खरेदी करत असलेल्या वस्तूंपैकी जवळपास निम्म्या वस्तू आशियातून येतात. जर हा मार्ग दीर्घकाळ बंद राहिला, तर ट्रम्प यांच्या देशातही दैनंदिन वस्तूंची टंचाई निर्माण होऊ शकते.
सीएनएनच्या एका अहवालानुसार, सामान्य अमेरिकन नागरिकाला हे माहीत नसेल की तो दररोज वापरत असलेल्या वस्तूंपैकी सुमारे ५०% वस्तू आशियातून येतात. आशियाई कारखान्यांमध्ये कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे उत्पादन थांबलं, तर त्याचा थेट परिणाम अमेरिकन स्टोर्सच्या साठ्यावर होईल. बेयर्डचे गुंतवणूक रणनीतीकार रॉस मेफील्ड यांनी इशारा दिलाय की, "अमेरिका आपल्या कल्पनेपेक्षा जास्त धोक्यात आहे." सध्या अमेरिकेतील स्थिती गंभीर नसली तरी, होर्मुझ मार्ग जितका जास्त वेळ बंद राहील, तितके अमेरिकेला या समस्यांपासून वाचणं कठीण होईल.
कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत
इराणसोबतच्या युद्धामुळे विशेषतः ॲल्युमिनियम, प्लास्टिक आणि रबरच्या जागतिक पुरवठ्याला धोका निर्माण झाला आहे. मध्य पूर्व देश जगातील सुमारे २५% पॉलीप्रोपाइलीन आणि २०% पॉलीएथिलीनचा पुरवठा करतात; ही दोन सर्वाधिक वापरली जाणारी प्लास्टिक आहेत. याशिवाय, हा प्रदेश जगातील एक चतुर्थांश सल्फर आणि १५% खतांचा स्रोत आहे. दक्षिण कोरियाची 'योचुन' आणि सिंगापूरची 'पीसीएस' यांसारख्या पेट्रोकेमिकल कंपन्यांनी 'फोर्स मेज्योर' घोषित केले आहे. याचा अर्थ असा की, परिस्थिती नियंत्रणाबाहेर असल्यानं या कंपन्या आता ग्राहकांना माल पुरवण्याची कायदेशीर हमी देऊ शकत नाहीत.
एसअँडपी ५०० चा 'ग्लोबल सप्लाय शॉर्टेज इंडिकेटर' गेल्या काही आठवड्यांत वेगानं वाढला असून तीन वर्षांत पहिल्यांदाच तो सरासरीच्या वर पोहोचला आहे. प्लास्टिकची टंचाई जगभर पसरण्यासाठी सुमारे तीन महिने लागू शकतात आणि चार महिन्यांनंतर ॲल्युमिनियमच्या कमतरतेमुळे ऑटोमोबाईल कंपन्यांना उत्पादन कमी करावं लागू शकतं.
किमती वाढण्याची भीती
प्लास्टिक पॅकेजिंगच्या कमतरतेमुळे अन्नपदार्थांपासून ते दैनंदिन वस्तूंच्या डिलिव्हरीवर परिणाम होत आहे. एका प्रमुख कंडोम निर्मात्यानं इशारा दिलाय की, कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे किमतीत मोठी वाढ होईल. जेव्हा कारखान्यांकडे पॅकेजिंग नसेल तेव्हा ते माल कसा पाठवणार? जेव्हा इंधनाच्या कमतरतेमुळे कर्मचारी कामावर पोहोचू शकणार नाहीत, तेव्हा उत्पादन कसं होणार? हेच ते दुष्टचक्र आता अमेरिकेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.
केपीएमजीच्या ग्लोबल हेड एंजी गिल्डिया यांच्या मते, जग सध्या तेल आणि डिझेलवर चर्चा करत आहे, परंतु खरा धोका पेट्रोकेमिकल्स आणि फीडस्टॉक्सच्या कमतरतेचा आहे. जर होर्मुझमधून होणारा पुरवठा थांबला, तर अमेरिकेतील शेतीपासून मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत सर्वच गोष्टींवर परिणाम होईल. केपलरच्या अंदाजानुसार, एप्रिलच्या अखेरपर्यंत होर्मुझ मार्गावरून होणाऱ्या तेल पुरवठ्यात ७०० मिलियन बॅरलची मोठी घट होऊ शकते.
Web Summary : Hormuz Strait's closure impacts Asia, threatening US supply chains. Shortages of raw materials like plastic and aluminum could disrupt American manufacturing and daily goods. Experts warn of potential price hikes and economic strain.
Web Summary : होरमुज जलडमरूमध्य के बंद होने से एशिया प्रभावित, अब अमेरिकी आपूर्ति श्रृंखला खतरे में। प्लास्टिक, एल्यूमीनियम जैसे कच्चे माल की कमी से अमेरिकी विनिर्माण और दैनिक वस्तुएं बाधित हो सकती हैं। विशेषज्ञों ने संभावित मूल्य वृद्धि की चेतावनी दी है।