यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवसात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 13:28 IST2025-08-18T13:28:14+5:302025-08-18T13:28:45+5:30
Yavatmal : वणी तालुक्यात दोन तर आर्णी तालुक्यात एका शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Three farmers commit suicide in a single day in Yavatmal district
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी / सावळी सदोबा (यवतमाळ) : नापिकी, पिकांचे झालेले नुकसान आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे यवतमाळ जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वणी तालुक्यात दोन तर आर्णी तालुक्यात एका शेतकऱ्याने जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. वणी तालुक्यातील सैदाबाद येथील शेतकरी राजकुमार मारोती गोवारदिपे (५५) यांची नवरगाव येथे शेतजमीन आहे. त्यांनी राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच त्यांना उपचारासाठी तातडीने वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व दोन नातवंडे असा परिवार आहे.
दुसरी घटना कळमना (बु) ता. वणी येथे घडली. शेतकरी सहदेव विश्वनाथ बोबडे यांनी स्वतःच्या राहत्या घरी विषारी द्रव प्राशन केले. त्यांना वणी येथील एका खासगी रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नावे कळमना (बु.) येथे १.२९ हे. आर. जमीन आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडील व आप्त परिवार आहे.
आर्णी तालुक्यातील पळशी येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. अरविंद सूर्यभान धुर्वे (३८) असे मृताचे नाव आहे. त्यांच्यावर सहकारी सोसायटीचे कर्ज आहे. नापिकी आणि कर्जामुळे ते मागील काही महिन्यांपासून विवंचनेत होते. यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व आप्त परिवार आहे.