शेतकऱ्याला भरपाई नाकारणे 'सोम्पो'ला भोवले; ग्राहक आयोगाचा चपराक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 15:02 IST2026-05-06T15:01:25+5:302026-05-06T15:02:37+5:30

Yavatmal : सातबारावर नाव नाही म्हणून काय झाले? वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य मालमत्तेचे वारसदार ठरतात, असे नमूद करत यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने शेतकऱ्याला भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

'Sompo' was caught red-handed in denying compensation to farmers; Consumer Commission slams it | शेतकऱ्याला भरपाई नाकारणे 'सोम्पो'ला भोवले; ग्राहक आयोगाचा चपराक

'Sompo' was caught red-handed in denying compensation to farmers; Consumer Commission slams it

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ :
सातबारावर नाव नाही म्हणून काय झाले? वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य मालमत्तेचे वारसदार ठरतात, असे नमूद करत यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाने शेतकऱ्याला भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. मुलाचा खून झाल्याने शेतकऱ्याने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दाखल केलेल्या दाव्यात हा निकाल देताना आयोगाने दी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीला चपराक दिली आहे.

करंजी (ता. उमरखेड) येथील बापूराव कोंडबा घुगरे यांचा मुलगा समाधान बापूराव घुगरे याचा १ जुलै २०२१ रोजी त्याच्या भावाने खून केला. शेतकरी कुटुंब असल्याने विमा योजनेचा लाभ मिळावा याकरिता बापूराव घुगरे यांनी दावा दाखल केला. विमा पॉलिसी कालावधीत सातबारावर बापूराव घुगरे याचे नाव नाही, या कारणावरून विमा कंपनीने भरपाई नाकारली. त्यामुळे त्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगात धाव घेतली. आयोगाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र उल्हास मराठे, सदस्य अनिल तोष्णीवाल यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली. बापूराव घुगरे यांचे वडील कोंडबा सत्तू घुगरे यांच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने बापूराव व त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य वारस झाले. समाधान हा बापूराव घुगरे याच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे विमा कंपनीने बापूराव घुगरे यांना भरपाई द्यावी, असा आदेश जिल्हा ग्राहक आयोगाने दिला आहे.

खून हा अपघात होऊ शकत नाही

समाधान घुगरे याचा खून झाला. हा प्रकार अपघाताच्या श्रेणीत येत नाही, अशी बाजू कंपनीने आयोगापुढे मांडली. समाधान झोपेत असताना त्याच्यावर हल्ला झाला. कुठल्याही प्रकारचा प्रतिकार त्याच्याकडून झाला नाही. त्यामुळे त्याचा खून झाला असला तरी ही घटना अपघात या संज्ञेत येईल, असे मत आयोगाने नोंदविले. समाधानचा मृत्यू अपघातीच असल्याचे नमूद करत विमा कंपनीची प्रकरण खारीज करण्याची विनंती आयोगाने नाकारून भरपाईचा निर्णय दिला.

असा आहे आदेश

विमा कंपनीने बापूराव घुगरे यांना दोन लाख रुपये आठ टक्के व्याजासह द्यावेत. शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल दहा हजार आणि तक्रार खर्चाचे पाच हजार रुपये द्यावेत, असे आदेशात नमूद केले आहे.
 

Web Title : बीमा अस्वीकृति पड़ी भारी: उपभोक्ता फोरम ने शोम्पो पर जुर्माना लगाया।

Web Summary : उपभोक्ता फोरम ने बीमा कंपनी पर किसान के दुर्घटना दावे को अस्वीकार करने पर जुर्माना लगाया। कंपनी ने भूमि स्वामित्व मुद्दों का हवाला देते हुए मुआवजे से इनकार किया। फोरम ने बेटे की हत्या को बीमा पॉलिसी के तहत दुर्घटना माना और मुआवजे का आदेश दिया।

Web Title : Insurance denial backfires: Consumer forum penalizes Shompo for farmer claim.

Web Summary : Consumer forum penalizes insurance firm for denying farmer's accident claim. The firm denied compensation citing land title issues. The forum deemed the son's murder an accident under the insurance policy, ordering compensation.

टॅग्स :nagpurनागपूर